व्यावसायिकांच्या अतिक्रमणाने गिळले रस्ते!

0

रावेत : रावेत, वाल्हेकरवाडी या भागाचा महापालिकेत समावेश होऊन जवळपास 20 वर्ष उलटली आहेत. परंतु अद्यापही येथील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. प्रभाग क्रमांक 16 व 17 मध्ये या दोन्ही परिसरांची विभागणी झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजीमंडई. परंतु, या दोन्ही प्रभागात कोठेही महापालिका प्रशासनाची अधिकृत भाजीमंडई नाही. त्यामुळे भाजीपाला व फळे विक्रेत्यांना रस्त्यावरच आपला व्यवसाय करावा लागत आहे. भाजीविक्रेत्यांचे रस्त्यावर अतिक्रमण वाढत असून, त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. सकाळी व सायंकाळच्या सुमारास ग्राहकांची गर्दी वाढल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर रूप धारण करत असून, सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या परिसरात मोठी भाजीमंडई उभारावी, अशी मागणी होत आहे.

अनेक वर्षांपासूनची मागणी
रावेत, वाल्हेकरवाडीत मूलभूत सुविधा पुरवत असताना महापालिका प्रशासन भाजीमंडईच्या बाबतीत मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात एकही अधिकृत भाजीमंडई नसल्यामुळे भाजी विक्रेत्यांना रस्त्यावरच व्यवसाय करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून याठिकाणी भाजीमंडई उभारण्याची मागणी आहे. भाजी विक्रेत्यांना हक्काची भाजीमंडई केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्वतंत्र जागा नसल्याने गुरुद्वारा चौकामध्ये मुख्य रस्त्यावरच भाजीमंडई भरत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस ही समस्या अधिकच बिकट होत आहे.

विक्रेत्यांचे ठिकठिकाणी अतिक्रमण
वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वारा चौक ते ममेली चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फळे, भाजीपाला तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चौकात तर पदपथावरही भाजी-फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचार्‍यांना मुख्य रस्त्यावरूनच जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. सायंकाळी या चौकात वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. भाजीविक्रेते व इतर व्यावसायिकांनी रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, हे अतिक्रमण वेळीच हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कारवाईचा नुसताच देखावा
अतिक्रमणांसंदर्भात तक्रारी वाढल्या की, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कारवाईसाठी येतात. मात्र, ठोस कारवाई होत नसल्याने पुन्हा अतिक्रमण जैसे-थे होतात. ठोस स्वरुपाची कारवाई कोणावरही होत नाही. त्यामुळे अतिक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाढत्या अतिक्रमणावर तोडगा काढण्यासाठी या भागात भाजीमंडई उभारावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. अतिक्रमणामुळे रस्ता दुभागला जात असून, वाहनचालक व पादचार्‍यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा या रस्त्यावर अपघातदेखील घडलेले आहेत.

कचर्‍याची समस्याही गंभीर
या व्यावसायिकांनी रस्त्यालाच आपले दुकाने बनवले असून, भर रस्त्यात तेथे विक्री करण्यात येते. भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. भाजीविक्रेते भाजी विक्री झाल्यानंतर उरलेला कचरा जागेवरच सोडून निघून जातात. हा कचरा पडून राहत असल्याने सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होतो. सध्या पावसाळा असल्याने या परिसरात कचर्‍याची समस्या गंभीर झाली आहे. महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. भाजीविक्रेत्यांच्या तसेच नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने याठिकाणी भाजीमंडई उभारणे गरजेचे आहे.

नगरसेवकांकडून पाठपुरावाच नाही
व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या जीवघेणी झाली आहे. भविष्यात या ठिकाणी अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. भाजीविक्रेत्यांना भाजीमंडईची सोय करून दिल्यास विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असे विक्रेत्यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने भाजीमंडईच्या आरक्षणाचा लवकरात लवकर विचार करून भाजीमंडईचे गाळे बांधण्याची गरज आहे. स्थानिक नगरसेवकांनीही या प्रश्‍नी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. परंतु त्यांनीही मौन बाळगल्याने महापालिका प्रशासनापर्यंत हा विषय पोहचत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.