व्यावसायिकाची पावणे दोन कोटींची फसवणूक

0
भोसरीच्या सुवर्णा फायब्रोटक कंपनीवर गुन्हा
पिंपरी चिंचवड : एका मोठ्या कंपनीने वर्कऑर्डर काढून एका लहान कंपनीकडून 1 कोटी 70 लाख 4 हजार 750 रुपयांचा माल तयार करून घेतला. परंतु त्या मालाचे पैसे लहान कंपनीला दिले नाहीत. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 फेब्रुवारी 2002 ते 12 सप्टेंबर 2018 हा कालावधीत घडला. कुल्लुवित्तील मथ्थाई जॉनी (वय 73, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नेल्वीन पी. वर्गीस (रा. नेल्वीन इंटरप्रायजेस, लांडेवाडी, भोसरी), पी आय वर्गीस, जॉन्सन सुवर्णा (दोघे रा. सुवर्णा फायब्रोटक प्रा. लि., भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रक्कम दिली नाही, शिवाय धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून जॉनी यांच्या कंपनीतून 1 कोटी 70 लाख 4 हजार 750 रुपयांचा माल तयार करून घेतला. त्यासाठी आरोपींच्या कंपनीकडून रीतसर वर्क ऑर्डर काढण्यात आली. परंतु आरोपींनी झालेल्या कामाची रक्कम जॉनी यांना दिली नाही. तसेच तयार केलेला माल देखील परत केला नाही. आरोपींनी जॉनी यांना खोट्या तक्रारीमध्ये फसविण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. यावरून जॉनी यांनी न्यायालयात तक्रार दिली. न्यायालयाने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.