व्यावसायिकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलीसांना निवेदन

0

धुळे । शहरातील मालेगाव रोडवर निवारी एका छोट्या व्यावसायिकाला मारहाण करीत लुटीची घटना घडल्यानंतर मालेगाव रोड- चाळीसगाव रोडवरील व्यापार्‍यांनी एकत्र येवून केवळ संघटनाच गठीत करुन मोर्चा काढला. गुंडांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मालेगाव रोडवरील बर्फ कारखान्याजवळ शनिवारी एका चहाविक्रेत्याला मारहाण करीत लुटीची घटना घडली होती. त्यानंतर नगरसेवक संदीप पाटोळे, अनिल खंडेलवाल यांच्यासह परिसरातील व्यापार्‍यांनी एकत्र येत बैठक घेतली. त्याला चाळीसगाव रोडवरील व्यापार्‍यांचीही साथ लाभली. शहरात या आधीच स्थापन झालेल्या पारोळारोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल माने, देवभानकर यांनीही या बैठकीला हजेरी लावत संघटनेचे महत्व विशद केले.

तीव्र आंदोनाचा इशारा
स्टेशनरोड-मालेगाव रोडवरील परिसरीय व्यापारी संघटना गठीत करण्यात आली.या संघटनेच्या माध्यमातून मालेगाव रोडवरील अग्रसेन पुतळा येथुन मोर्चा काढण्यात आला. गुंडांचा बंदोबस्त करा, अशा घोषणा देत व्यापारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले. तेथे व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांची भेट घेवून निवेदन दिले. वेळीच गुंडांचा बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या मोर्चाचे नेतृत्व नगरसेवक संदीप पाटोळे, अनिल खंडेलवाल यांनी केले तर संघटनेचे पदाधिकारी दिनेश आटोळे, रविशंकर भदोरिया, जुझर आईसवाला, इम्तीयाज लोहार,मनोहर पिंजारी, आबीद लोहार, महेश बांगड यांच्यासह चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बहुसंख्य व्यापारी सहभागी झाले होते.