व्यावसायिक इमारतीला चुकीच्या पध्दतीने वीजजोड

0

समिती सदस्य राहुल कोल्हटकर यांचा आरोप

मोशी : मोशी प्राधिकरण पेठ क्र. 6 येथील प्रिव्हीया बिझनेस सेंटर या व्यावसायिक इमारतीला चुकीच्या पद्धतीने आणि बेजबाबदारपणे वीजजोड देण्यात आले आहे. ही गंभीर बाब असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर संबधितांवर कारवाई करण्यास महावितरणाकडून टाळाटाळ करून अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांना पाठिशी घातले जात आहे, असा आरोप विद्युत वितरण समिती सदस्य राहुल कोल्हटकर यांनी केला आहे.

कोल्हटकर म्हणाले की, उर्जामंत्र्यांसह मुख्यमंत्री, उर्जा विभागाचे प्रधान सचिव, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक आणि येरवड्यातील विद्युत निरीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर प्रव्हिया बिजनेस सेंटर येथील धोकादायक विद्युत रोहित्र महावितरणाने हटविले. परंतु, सद्यस्थितीत या व्यावसायिक इमारतीस वीजपुरवठा कुठुन केलेला आहे, चुकीचे काम करणार्‍या संबधित अधिकार्‍यांवर काय कारवाई झाली, याबाबत महावितरणाकडुन आणखी अहवाल देण्यात आलेला नाही. महावितरण व विद्युत निरीक्षण विभागाने हे विद्युत रोहित्र हलविल्यामुळे चुकीचे काम झाल्याचे स्पष्ट झाले.

पाठपुरावा करूनही कारवाई नाही
महावितरणाच्या व्यवस्थापकीय संचालकांना संबधित तक्रारदार कोल्हटकर यांना कारवाईची माहिती देण्याचे पत्राव्दारे कळविण्यात आले. त्यानंतर अधीक्षक अभियंता यांच्याकडून कार्यकारी अभियंता व अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना महावितरण कंपनीच्या नियमानुसार त्वरित कार्यवाही करून सविस्तर अहवाल देण्याबाबत 28 मार्च व 16 एप्रिल असे दोन वेळा पत्र देण्यात आले. त्यानंतर वारंवार विचारणा व पाठपुरावा करून देखील कुठलीही कार्यवाही झाली नाही. कोणत्याही संबधित अधिका-यांवर कारवाई केली गेली नाही. कारवाई होत नसल्याने भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत असून महावितरणाकडून आपल्या अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांना पाठिशी घातले जात आहे.

या इमारतीला बेकायदेशीर वीजपुरवठा चालू असुन तेथे अनेक व्यावसायिक दुकाने व ऑफिस चालू झाले आहेत. शेजारीच आरटीओचे नवीन कार्यालय चालू झाले असून नागरिकांचा वावर वाढला आहे. बेकायदेशीर वीज पुरवठ्यामुळे अपघाताची शक्यता आहे. लोकांचा जीव धोक्यात असताना व चुकीचे काम केले असतांना सुद्धा विद्युत निरीक्षक कार्यालय, महावितरण यांच्याकडून महावितरणचे अधिकारी व ठेकेदार, बिल्डर यांनी संगनमताने भष्टचार करून चुकीची कामे केली असून वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठिशी घालत आहेत. या प्रकरणी लवकरच आंदोलन करणार असून न्यायालयात याचिका देखील दाखल करणार असल्याचे राहुल कोल्हटकर यांनी म्हटले आहे.