व्हाईटवॉश देणार?

0

मुंबई । तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अपराजीत आघाडी घेणारा भारतीय संघ रविवारी होणार्‍या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाला व्हाईटवॉश देण्याच्या इर्‍याद्याने मैदानात उतरेल. या सामन्यात बेंच स्ट्रेंथ अजमावून बघण्याची संधी भारताकडे आहे. दुसरीकडे पाहुण्या श्रीलंकेसाठी हा दौरा खूपच निराशाजनक ठरला. टी 20 क्रिकेट मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतील पराभवामुळे त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. भारताने कटकमधील पहील्या सामन्यात श्रीलंकेला 93 धावांनी हरवले होते. त्यानंतर शुक्रवारी इंदूरमधील सामन्यात 88 धावांनी विजय मिळवत भारताने मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्याआधी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत श्रीलंकेला 1-2 असा पराभव पत्कारावा लागला होता. तर कसोटी मालिकेतही त्यांच्या पदरी पराभवच पडला होता. भारतीय संघाने या मालिकेत सर्व प्रकारच्या प्रारुपांमध्ये विजय मिळवले आहेत. द.आफ्रिकेच्या दौर्‍यावर रवाना होण्यापुर्वी आणखी एका विजयासह आत्मविश्‍वास उंचावण्याचे प्रयत्न भारतीय संघ करेल. द.आफ्रिकेच्या दौर्‍यात भारतीय संघाला तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तिन टी 20 सामने खेळायचे आहेत. भारतीय फलंदाजीचा क्रम कुठल्याही गोलंदाजांना सामोरा जाऊ शकतो. याचे सारे श्रेय इंडियन प्रिमिअर लीग आणि भारतीय क्रिकेटच्या मुलभूत ढाच्याला जाते. युजवेंद्र चहल, कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणासह सातत्याने विकेट्स मिळवत संघात आपली जागा पक्की केली आहे. याशिवाय आशिष नेहराच्या निवृत्तीनंतर संघातील आणखी एका वेगावन गोलंदाजाची जागा भरुन काढण्यासाठी सौराष्ट्राचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटकडे निवड समिती नजर ठेवून आहे.

द. आफ्रिकेच्या दौर्‍यापूर्वी श्रीलंकेविरुद्धची मालिका भारतीय संघाला तयारीच्यादृष्टीने खूप महत्वाची होती. त्यात भारतीय संघाने विजयही मिळवले. पण हे सर्व विजय एकतर्फी असल्याने द.आफ्रिकेच्या कठिण दौर्‍यासाठी व्यवस्थित तयारी झाली आहे असे म्हणता येणार नाही. पण यातील सकारात्मक बाजू म्हणजे कर्णधार विराट कोहलीसह संघात वरिष्ठ खेळाडू नसताना युवा खेळाडूंनी टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. संघाचा हंगामी कर्णधार रोहित शर्माने टी 20 मधील वेगवान शतक झळकवून डेव्हीड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. हाच फाँर्म रोहित घरच्या मैदानावरही कायम ठेवण्यास उत्सुक असेल.

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चाहल, जसप्रीत बुमराह, दीपक हूडा, महंमद सिराज, बेसिल थंपी, जयदेव उनाडकट.

श्रीलंका- थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल परेरा, धनुष्का गुणतिलका, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), असेला गुणरत्ने, सादीरा समराविक्रमा, दसुन शनाका, चतुरंग डीसिल्व्हा, सचिथ पथिराना, धनंजया डीसिल्व्हा, नुवान प्रदीप, विश्‍वा फर्नांडो, दुष्मंता चमीरा.