व्हिप झुगारला ; वरणगाव नगराध्यक्षांसह दोघा नगरसेवकांना नोटीस

0
राजकारण पेटले ; जिल्हाधिकार्‍यांकडे 28 रोजी सुनावणी
भुसावळ – तालुक्यातील वरणगाव पालिकेच्या चुरशीच्या झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंत्री महाजन गटाचे कमळ फुलल्यानंतर सुनील काळे यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती तर खडसे गटाच्या नगरसेवकांचा दारूण पराभव झाला होता. तत्पूर्वी खडसे गटाने गटनेता बदलाची नोंदणी करत नितीन माळी यांना गटनेता जाहिर केले होते.
माळी यांनी व्हिप काढत रोहिणी जावळे यांना मतदान करण्यासंदर्भात बजावल्यानंतर भाजपचे सुनील काळे, नगरसेविका नसरीनबी साजीद कुरेशी व माला मिलींद मेढे यांनी व्हिपची अंमलबजावणी न करता स्वतः नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या काळे यांना मतदान केले व राष्ट्रवादीचा टेकू घेत काळे हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. यानंतर नितीन माळी यांनी भाजपाच्या उभय तीन नगरसेवकांनी व्हिप झुगारल्याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे संबंधितांना अपात्र करणयासंदर्भात याचिका दाखल केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी याप्रकरणी भाजपच्या सुनील काळे, कुरेशी व मेढे या तीन नगरसेवकांना नोटीस बजावल्याने वरणगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 28 रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. माजीमंत्री खडसेंच्या बालेकिल्ल्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी आपले वजन वापरत कमळ फुलवल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली होती.