‘व्हीव्हीपॅट’ जागृतीसाठी प्रात्यक्षिक मोहीम

0

जिल्ह्यात 42 मोबाइल व्हॅनद्वारे जनजागृती

पुणे : आगामी निवडणुकांमध्ये व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रायल (व्हीव्हीपॅट) यंत्राचा पहिल्यांदाच वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे याबाबतच्या जनजागृतीसाठी मतदान केंद्रे, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर (इव्हीएम) मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. 42 मोबाइल व्हॅनद्वारे या महिन्याअखेरीस ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

’व्हीव्हीपॅट’बाबत मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. एका मतदारसंघात दोन मोबाइल व्हॅन यानुसार पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात 42 मोबाइल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. विधानसभानिहाय मतदान केंद्रे, महाविद्याालये, सरकारी कार्यालये, आठवडी बाजार अशा विविध ठिकाणी मतदानाचे प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यात येणार आहे.

चिठ्ठीवरून समजणार मतदाराचा कौल

’व्हीव्हीपॅट’ मतदान प्रणालीमुळे कोणाला मतदान केले आहे, हे मतदाराला समजू शकणार आहे. ’व्हीव्हीपॅट’मध्ये प्रिंटरप्रमाणे एक उपकरण जोडलेले असते. मतदाराने ’ईव्हीएम’वर बटण दाबल्यानंतर एक चिठ्ठी बाहेर पडते. त्यावरून मत कोणाला दिले, हे समजते. त्यावर मतदान केलेल्या उमेदवाराचे नाव, क्रम आणि निवडणूक चिन्ह दिसते. या पद्धतीचा अवलंब आगामी निवडणुकांमध्ये प्रथमच केला जाणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे. आता डिसेंबरअखेर नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत माहिती देण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे निवडणूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.