व्हॉट्सअॅपवर इस्लामविरोधी संदेश पाठविल्याने फाशीची शिक्षा!

0

लाहोर | व्हॉट्सअॅपवरून मुस्लीम मित्राला इस्लामविरोधी, अपमानजनक संदेश पाठविल्याच्या ठपका ठेवून पाकिस्तानात एका ख्रिश्चन नागरिकाला फाशीची शिक्षा सुनावली गेली. यानिमित्ताने पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समुदायावरील अत्याचाराचे वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

नदीम जेम्स ख्रिस्त याच्यावर गेल्या वर्षी जुलैमध्ये इस्लामच्या अवमानाचा आरोप लावण्यात आला होता. त्याच्या मित्राने त्याबाबात पोलिसांना तक्रार केली होती. ख्रिस्त याने व्हॉट्सअॅपवरून एक कविता पाठविली होती, जी इस्लामचा अवमान करणारी आहे, अशी ही तक्रार होती. या घटनेनंतर, संतप्त मुस्लीम जमावाच्या हल्ल्यातून बचावासाठी ख्रिस्त पंजाब प्रांतातील सारा-ए-आलमगिर शहर सोडून पळून गेला. नंतर तो पोलिसांना शरण गेला. सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या खटल्याची सुनावणी तुरुंगातच चालविली गेली. एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने ख्रिस्तला फाशीची शिक्षा शिवाय 3,00,000 रुपयांचा दंड देखील ठोठावला.

मुस्लीमबहुल पाकिस्तानमध्ये इस्लामची, अल्लाहची निंदा किंवा त्यावर टीका करणे, हा एक कायदेशीर गुन्हा आहे. या कारणाने हजारो अल्पसंख्यांकांवर गुन्हे नोंद केले गेले आहेत. ख्रिस्तचे वकील अंजुम यांनी तो निर्दोष असल्याहा युक्तिवाद न्यायालयात केला. आपल्या अशीलाला फसविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. एका मुस्लिम मुलीशी प्रेमसंबंधाच्या मूळ कारणातून त्याला नाहक यात गोवल्याचे युक्तिवादात मांडले गेले. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला. आता ख्रिस्त लाहोर हायकोर्टात अपील करणार आहे.