व्हॉट्सअ‍ॅपचा गैरवापर रोखायलाच हवा!

0

सोशल मीडियावरून बदनामी करण्याची धमकी देत लैंगिक शोषण करण्याचा एक नवा गुन्हेगारी ट्रेंड सध्या सर्वत्र दिसतो आहे. यामुळे गरजेकरिता फोन वापरणे, एखाद्या ग्रुपचा मेंबर होणं हे आता रिस्की ठरू पाहते आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरचा धिंगाणा तर अगदी सकाळी उठल्यावर कोण पहिली पोस्ट टाकतंय या स्पर्धेतूनच सुरू होतो. हाती चहाचा कप घेण्याआधी मोबाइल घेत प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात होते. हा मोबाइल मॅनिया, फोबिया खरेच योग्य आहे का? हे आपणच टाळू वा कमी करू शकत नाही का?

नाशिकमधल्या सिडको परिसरात घडलेल्या एका अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत लक्ष वेधून घेतले ते त्या संपूर्ण गुन्ह्यात सराईतपणे एखाद्या शस्त्रासारखा केलेला स्मार्टफोन, व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग. या मुलीवर अत्याचार करणारे भले अल्पवयीन असतील पण त्यांची समज, हा सगळा प्रकार व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अपलोड करणे, तो इतर ग्रुपवर शेअर करणे आणि पुन्हा पुन्हा त्या मुलीला अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत तिचे जगणे मुश्कील करणे असे सगळे प्रकार त्या प्रकरणात घडले आहेत. जे अत्यंत सुन्न करणारे आणि गंभीरपणे दखल घ्यावेत असे आहेत. यातल्या एका मुलाच्या आईने अगदी सहजपणे आमचा बंटी असा नाहीच, हीच मुलगी क्लासला जाता येता त्याला सोबत न्यायची, अन् भलतेच काहीतरी करायची, ती तसलीच आहे, असा आरोपही करायला मागे पुढे पाहिले नाही, मुद्दा हाच आहे की, असे गुन्हे घडल्यानंतर दोषी ठरते वा आयुष्यभर सहन करावे लागते ते पीडित मुलींनाच आणि म्हणूनच सोयीकरिता, सुरक्षेकरिता पालकांनी मुलांना दिलेला मोबाइल योग्य कारणाकरिता वापरला जातो की त्याचे भलतेच उपयोग होतात, हे पाहणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

किशोरवयीन मुलांना मोबाइलची सुविधा देताना पालकांनीच काही नियमावली कटाक्षाने घालून दिली पाहिजे, फक्त मुलींनाच नाही तर आता मुलांनीही सातच्या आत घरांत, नो लेट पार्टी, याचे बंधन घालावे. आपला मुलगा बाहेर जाऊन नेमके काय करतो, याची खातरजमा आठवड्यातून एकदा तरी पालकांनी केलीच पाहिजे. प्रश्‍न फक्त लक्ष देण्याचा नाही तर आपले मूल कोणाच्या जीवाशी खेळण्याइतपत गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळले नाही ना? त्याला इतर अनैतिक सवयी तर लागलेल्या नाहीत ना? याचाही यानिमित्ताने धांडोळा घेता येईल, कदाचित पालकांच्या सजगतेमुळे कोणाचे तरी आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकेल.

नुकतेच लंडन या देशातील एका अहवालानुसार त्या देशांतील 90 टक्के जनता ही मानसिक आजाराची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या देशातील युवा वर्गात सोशल मीडियाचे अफाट व्यसन त्यातून येणारी निराशा आणि मग आत्महत्येचा प्रयत्न करणे वा झोपेच्या गोळ्या घेणे, अमली पदार्थांच्या अधीन होणे, याबरोबरच प्रचंड राग, अगतिकता यातून आपल्या जवळच्या व्यक्तींवर हल्ले करणे, अशा प्रकारच्या घटनांत वाढ झाली आहे. खरे तर सोशल मीडियाच्या अवास्तव वापर आणि त्याच्या धोकादायक परिणामाबाबत सार्‍या जगालाच चिंता वाटते आहे. मात्र, हे व्यसन कमी न होता ते दिवसेंदिवस वाढते ठेवण्याचा प्रयत्न एका बाजूला उच्च तंत्रज्ञान, मोफत इंटरनेट सुविधा, डिजिटायझेशन आणि कमी किमतीत मिळणारे स्मार्ट फोन्स यांच्या मदतीने होतेच आहे. यातून कोणाचीही सुटका नाही, आपल्या मनावर, आपल्या वागण्यावर आपलेच नियंत्रण असणे हे आता अधिक महत्त्वाचे ठरते आहे.

सोशल मीडिया आता किती फोफावलाय आणि त्याची व्याप्ती किती वाढलीय, हे नव्याने सांगण्याची गरजच उरलेली नाही. हातोहाती मोबाइल दिसत असल्याने आणि अवघ्या काही रुपयांमध्ये नेटपॅकही मिळत असल्याने नेटकर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. विशेष म्हणजे नेटकर्‍यांचे सरासरी आयुष्यमानही कमी-कमी होत चालल्याचे वारंवार जागतिक आरोग्य संघटना स्पष्ट करते आहे. म्हणजे अगदी बारा-तेरा वर्षांच्या किशोरांपासून सर्वांना या वेडाने झपाटले आहे. लाइक्स मिळवण्याची चढाओढ लागलीय. लाइक्ससाठी इतरांच्या पोस्टही शेअर केल्या जाताहेत. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तर काही वेगळाच धिंगाणा असतो. अगदी सकाळी उठल्यावर कोण पहिली पोस्ट टाकतंय यासाठी जणू स्पर्धाच असते. ब्रश केल्यानंतर हाती चहाचा कप घेण्याआधी मोबाइल घेतला जातो. बरं, त्यातही पोस्ट कोण टाकतंय यावर प्रतिक्रिया अवलंबून असते. हे ग्रुप बहुतांश वेळा मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, ऑफिसमधील सहकारी यांचेच असतात. असे असूनही त्या छोट्या ग्रुपमध्येही हेवेदावे, स्ट्रॅटेजी, चालबाजपणा, कावेबाजपणा, डिवचणे, रुसवे, फुगवे असे सारे काही चालते. किंबहुना हेच प्रकार जास्त दिसतात. गेल्या काही दिवसांपासून या चेकाळलेल्या व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटर वॉरमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्याही बातम्या येताहेत. अशा बातम्या वाचल्या की मन व्यथित होतं. आपण जर सोशल नेटवर्किंग साइटवर सक्रिय असू तर मग आपल्यालाही कधीतरी अशा वादांचा अनुभव असतोच. पण, हे वाद इतके विकोपाला जाणे तितकेसे निकोप नसते. आपल्या देशात गुन्हेगारीचे प्रमाण बरेच वाढलेय, असे सरकारी आकडेवारीच सांगतेय. असे असताना सोशल नेटवर्किंगमुळे घडणार्‍या गुन्ह्यांनी यात भरच पडली आहे.

आतापर्यंत आपण एखाद्या व्यसनामुळे लोकांना आत्महत्या करताना ऐकले, पाहिले होते. पण, आता या व्यसनांमध्ये मोबाइल, सोशल नेटवर्किंग साइट्सचे व्यसनही प्रवेशले आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा गैरवापर रोखण्याकरिता आता पालकांनीच जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे.

संवाद – योगिनी बाबर
9960097266