आठ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर एकूण 1 हजार 306 तक्रारी व्हॉटस् अॅपवर दाखल
सर्वांत जास्त तक्रारी अस्वच्छतेसाठी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतेच्या तक्रारींमध्ये दिवसें-दिवस वाढ होतच आहे. अस्वच्छतेच्या तक्रारी कमी होताना दिसत नाहीत. मागील चार महिन्यात महापालिकेकडे व्हॉटस् अॅपवर दाखल झालेल्या 1 हजार 306 तक्रारींपैकी तब्बल 736 तक्रारी अस्वच्छतेशी संबंधित होत्या. नागरिकांच्या सेवेसाठी महापालिकेच्या वतीने सारथी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली होती. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर या सेवेचा वापर केला जात होता. सद्यस्थितीत सारथी हेल्पलाईन, संकेतस्थळ, ई-मेल, मोबाईल अॅप, संदेश (एसएमएस), लोकशाही दिन आणि किऑस्क इत्यादी माध्यमांद्वारे तक्रारी स्वीकारल्या जात होत्या. आता आधुनिक तंत्रज्ञानानुसार व्हॉट्सअॅपचा क्रमांक दिला आहे. त्यावर नागरिक आपल्या तक्रारी मांडताना दिसत आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी हेल्पलाईन
नागरिकांना सरकारी कामाचा वाईट अनुभव असल्याने ते महापालिकेत येऊन तक्रार करण्यासाठी टाळाटाळ करीत होते. त्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करुन तक्रार निवारणाचा पायंडा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामकाजात पडला आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिक घरबसल्या तक्रार करू लागले. पाणी वाहून जाते आहे, कुठे पाईपलाईन फुटलेली असते, अनेक प्रभागात सकाळचे पथदिवे चालू असतात, कुठे ड्रेनेज फुटलेले असते, तर कुठे कचरा पडलेला असतो. या सर्व तक्रारी करण्यासाठी नागरिकांना महापालिकेत येणे जरा अवघड जाते. कारण महापालिकेत काम तक्रार करणे म्हणजे महाभयंकर काम असते. त्यासाठी संकेतस्थळ, तक्रार क्रमांक, हेल्पलाईन आदी सुरू करण्यात आले होते.
तक्रार करणे सोयीचे
शहरातील नागरिकांना तक्रारी दाखल करणे अधिक सोईचे होणेकामी व्हॉट्सअॅपद्वारे तक्रारी स्वीकारण्याची सुविधा 2 नोव्हेंबर 2017 पासून उपलब्ध करून देण्यात आली. या सुविधेद्वारे आज अखेर 547 नागरिकांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. मागील चार महिन्यात महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर एकूण 1 हजार 306 तक्रारी व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून दाखल झाल्या आहेत. सध्या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिक आपल्या अडचणी, तक्रारी व्हॉटस्अॅपद्वारे महापालिकेकडे करीत आहेत. सर्वांकडे उपलब्ध असलेले स्मार्ट फोन यासाठी उपयुक्त ठरत आहेत. पटकन हाताशी असलेला मोबाईल मधून आपली तक्रार करणे सोयीचे आणि तुलनेने कमी खर्चाचे जाते. त्यासाठी प्रत्यक्ष महापालिकेत जायचा त्रास आणि खर्च दोन्ही वाचतात.
आरोग्य व कचर्याशी संबंधित तक्रारी
व्हॉटस्अॅपद्वारे नोंदविण्यात आलेल्या विविध तक्रारी वेगवेगळ्या विभागाच्या आहेत. यामध्ये आरोग्य, कचरा, स्थापत्य, पाणी पुरवठा, उद्यान, माहिती व तंत्रज्ञान विभाग, पर्यावरण अभियांत्रिकी, जलनिःसारण, अतिक्रमण, आकाशचिन्ह व परवाना, विद्युत, बीआरटीएस, पशूवैद्यकीय, झोनिपू विभाग, नागर वस्ती विभागाशी संबंधित तक्रारींचा समावेश आहे. यामध्ये आरोग्य व कचर्याशी संबंधित तब्बल 736 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक 164 तर त्या खालोखाल ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 126 तक्रारींचा त्यात समावेश आहे. महापालिका हद्दीत सध्या कचरा, पाणी आणि वीज या महत्वाच्या प्रश्नांवर जास्त तक्रारी आल्या आहेत. अ क्षेत्रीय कार्यालय 164, ब क्षेत्रीय कार्यालय 109, क क्षेत्रीय कार्यालय 119, ड क्षेत्रीय कार्यालय 123, इ क्षेत्रीय कार्यालय 40, फ क्षेत्रीय कार्यालय 126, ग क्षेत्रीय कार्यालय 35 आणि ह क्षेत्रीय कार्यालयाकडे 20 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.