व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकद्वारे छेडछाड होत असल्यास त्वरित पोलिसांत तक्रार द्या

0

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांचे आवाहन

गंगातारा सोशल फाउंडेशनतर्फे महिलांचा सन्मान

हडपसर : व्हाट्सअ‍ॅप,फेसबुकद्वारे महिलांची छेडछाड होत असेल तर त्यांनी याकडे दुर्लक्ष न करता, ताबोडतोब पोलिसांमध्ये तक्रार द्यावी. पोलीस सायबर ब्रँचद्वारे याची तपासणी करून संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते. यासाठी महिलांनी सतर्क राहून अनोळखी व्यक्ती सोबत चॅटिंग करू नये. जेणेकरून यामधून निर्माण होणार्‍या समस्या उद्भवणार नाहीत. याची काळजी महिलांनी घेतली पाहिजे, असे मत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी व्यक्त केले.

हडपसर येथील गंगातारा सोशल फाउंडेशनच्या वतीने सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त, हडपसर परिसरातील शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांना विविध पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

क्रांतीज्योती सावित्रीमाई पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या समाजसेविका स्वाती जोशी, अ‍ॅड. माधुरी देसाई, अभियंता हेमा लाळगे, शिक्षिका संध्या हिरमुखे, आर्किटेक्चर पोर्णिमा लुणावत या पाच महिलांना प्रमुख पाहुणे भारती वैद्य व सुनिल तांबे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष नीता भोसले, पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या सदस्या अ‍ॅड.लक्ष्मी माने, शीतल चांदणे, मनीषा माने, अ‍ॅड. दिलीप जगताप, सुरेंद्र काडगे, तानाजी देशमुख आदी उपस्थित होते.

मोफत कायदा सल्ला केंद्र सुरू करणार

गंगातारा सोशल फाउंडेश हे महिलांच्या हक्कासाठी काम करणार असून पीडित व गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर महिलांवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत कायदा सल्ला केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता भोसले यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती जगदाळे व आभार अ‍ॅड. प्रियदर्शनी परदेशी यांनी मानले.

पोलिसांनी जाणून घेतल्या महिलांच्या समस्या

तांबे यांनी महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या पोलिसांविषयी अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी अनेक महिलांनी सुनिल तांबे यांना प्रश्‍न विचारले. यावर त्यांनी ही त्यांचे समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी समाजामध्ये शिक्षित महिलांनी सावित्रीमाईचा आदर्श घेऊन आपण ही समाजाच्या कामासाठी पुढाकार घ्यावा आणि धार्मिक कर्मकांड बाजूला ठेवून महिलांचा उद्धार आणि आपल्या देशाचे नाव कसे मोठे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भारती वैद्य यांनी सांगितले.