मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील घटना ; 25 लाखांचे नुकसान
भुसावळ- मुर्तिजापूर ते अचलपूर व अचलपूर-मुर्तिजापूर धावणार्या शकुंतला पॅसेंजरच्या गार्ड बोगीला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री 12 वाजेनंतर घडल्याने प्रशासनाने धावपळ उडाली. आगीचे निश्चित कारण कळाले नसलेतरी बोगीत झालेल्या शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय असून या घटनेत सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले तर बुधवारच्या सर्व फेर्या रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
शॉर्टसर्किटने आग ; तीन डबे बाजूला केल्याने टळले नुकसान
52137 अचलपूर-मुर्तिजापूर धावणारी शकुंतला एक्स्प्रेस सायंकाळी सहा वाजेनंतर मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर उभी असताना मंगळवारी रात्रीनंतर 12.35 वाजेच्या सुमारास गार्ड बोगी (क्रमांक 915 जीएसआर) ने अचानक पेट घेतल्याने धावपळ उडाली. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर पॅसेंजरला लावलेले अन्य तीन डबे वेगळे करण्यात आल्यानंतर अधिक नुकसान टळले. सूत्रांच्या माहितीनुसार गार्ड बोगीतील बॅटरी चार्जिंगदरम्यान शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज असून या घटनेत सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले. आगीमुळे बुधवारच्या पॅसेंजरच्या फेर्या रद्द करण्यात आल्या तर गुरुवारी मात्र ही गाडी धावणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शकुंतला पॅसेंजर ही नॅरोगेज मार्गावरील गाडी असून मूर्तिजापूर ते अचलपूर हे 76 किलोमीटरचे अंतर ती साडेतीन तासात पूर्ण करते.