शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

0

पुणे । गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे 12 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे आणि जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

महोत्सवातील दोन उपक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम शनिवार वाड्यावर 12 ऑगस्टला संध्याकाळी साडेपाच वाजता होणार असून, यावेळी बोधचिन्हाचे अनावरण, शुभंकर चिन्हाचे अनावरण, मोबाइल ऍप आणि वेबसाइटचे उद्घाटन याशिवाय ‘थीम साँग’चे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. हे थीम साँग नरेंद्र भिडे यांच्या संगीत संयोजनाखाली तयार केले असून, बेला शेंडे, उदित नारायण, शंकर महादेवन या गायकांचा यात सहभाग असल्याचे टिळक यांनी सांगितले.

तीन हजार ढोलांचे एकावेळी वादन
23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर तीन हजार ढोलांची एकाच वेळी वादन करून या उपक्रमाचा रेकॉर्ड करण्याचा मानस असल्याचे टिळक म्हणाल्या. गिनीज बुक च्या नियमानुसार प्रत्येक पथकाकडून वादकांची संख्या आणि प्रत्येकाच्या नावाची नोंद करून घेणार, त्यांना त्यांच्या नावाचा स्वतंत्र हातात बांधण्यासाठी बॅण्ड देण्यात येणार असल्याचे टिळक म्हणाल्या. याशिवाय एकाचवेळी एकाच प्रकारचे वादन होईल असे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हा उपक्रम सुरू असताना ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन केले जाईल. प्रदूषण महामंडळालाही याची माहिती दिली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली.

शाडूच्या तीन हजार गणेश मूर्ती
कै. बाबुराव सणस मैदानावर तीन विद्यार्थ्यांमार्फत शाडूच्या तीन हजार गणेश मूर्ती बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त शहरात वातावरण निर्मिती करण्यासाठी शहरातील 3500 किमी च्या रस्त्यावर गणेशोत्सव, संस्कृती या संदर्भातील भित्तीचित्रे काढण्यात येणार आहेत. याशिवाय गणेशोत्सव मंडळांव्यतिरिक्त सोसायट्यांमधील गणेशोत्सवांच्या सजावटीची स्पर्धाही घेण्यात येणार आहे.

या महोत्सवासाठी महापालिकेने दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामधील एक कोटी 67 लाख रुपये खर्च महापालिकेने अपेक्षित धरला आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यास ते पैसे प्रायोजकत्त्वातून उभारण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी नमूद केले.

चार दिवस होणार कार्यकक्रम
याच दिवशी अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम होणार आहे आणि तो विनामूल्य आहे. चार दिवस हे कार्यक्रम होणार असून उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम, 20 ऑगस्टला दुचाकी रॅली, 23 ऑगस्टला तीन हजार ढोल ताशांचे वादन आणि 24 ऑगस्टला तीन हजार विद्यार्थ्यांमार्फत शाडुच्या गणेशमूर्ती बनवणे असे कार्यक्रम होणार आहेत.

दुचाकी रॅली
सकाळी आठ वाजता शनिवारवाड्यापासून दुचाकी रॅली सुरू होणार असून, ती रमणबाग चौकात समाप्त होणार आहे.