थिरूवनंतपुरम-केरळच्या शबरीमला मंदिर परिसरात महिलांच्या प्रवेशाचा संपता संपत नाहीये. आज सकाळी ५० वर्षांहून कमी वय असलेल्या ११ महिला दर्शनासाठी आल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. मंदिर प्रवेशासाठी या महिलांनी मदुराईमधून पायी यात्रा सुरू केली होती. भाविकांकडून जोरदार विरोध प्रदर्शन सुरू असून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विरोध करणाऱ्या काही भाविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, दर्शनासाठी आलेल्या महिला चेन्नईतील ‘मानिथि’ संघटनेच्या सदस्य आहेत. मंदिरात प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही. भगवान अयप्पा यांचे दर्शन होईपर्यंत आमचा निषेध सुरूच ठेवू. सुरक्षेच्या कारणांमुळे पोलिसांनी आम्हाला परत जाण्यास सांगितलंय, पण आम्ही जाणार नाही, असे तिलकवती या महिलेने सांगितले. तणावपूर्ण परिस्थिती पाहता पथानामथिट्टा जिल्ह्यातील कलम १४४ आता २७ डिसेंबरपर्यंत लागू करण्यात आले आहे.
दुसरीकडे, महिला भाविकांचा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू असताना अयप्पाचे भक्त कोट्टायम रेल्व स्टेशनवर आंदोलन करत आहेत. जवळपास ३० महिला मंदिरात दर्शनासाठी येऊ शकता याची पूर्वकल्पना पोलिसांना होती त्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारपासूनच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी शबरीमला मंदिरात १० ते ५० वर्षाच्या महिलांना प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. पण सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवल्याने नवा वाद सुरू झाला आहे.
भाजप नेत्या सोभा सुरेंद्रन यांनी महिला प्रवेशाच्या विरोधात निषेध करत उपोषण सुरु केले आहे.