तिरुअनंतपुरम –केरळमधील सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषत: 15 वर्षांहून अधिक वयाच्या मुलींना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता. केवळ लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जायचा. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा मानव अधिकाराचा उल्लंघन असून महिलांना देखील मंदिर प्रवेश करण्यापासून रोखता येणार नसल्याचे निर्णय दिले. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे मात्र विरोधही केला जात आहे. या ऐतिहासिक निर्णयाला विरोध दर्शववणारे मोर्चे काढले जात आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. मंदिरातील महिला प्रवेश निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी आज भाजपाच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबरला दिला होता. ”महिला या पुरुषांपेक्षा दुय्यम नाहीत. महिलांना देवाची पूजा करण्यावरही बंधनं घातली जातायत. देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाहीत. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी स्त्री व पुरुषावरून भेदभाव करणं योग्य नाही. ”, असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले होते.