काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी भाजपच्या नेत्यांचा उत्साह वाढवण्याचे काम केले आहे. गुजरातच्या निवडणुकीत बॅकफूटवर गेलेल्या भाजपला अय्यर यांच्या नीच किस्म का आदमीने प्राणवायू मिळवून दिला आहे. असे म्हणतात की महाभारतात दुर्योधनाने धुतराष्ट्राला जेवढे जीवघेणे शब्द वापरले होते तेवढीच या शब्दांची व्याप्ती होती. अय्यर यांचे हे वाक्य आता काँग्रेससाठी अडचणीचे ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर या वाक्याचा चाबूक बनवून काँग्रेसवर त्याचे आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे. ते तर आता सभांमधून प्रश्नच विचारत आहेत, हा कुणाचा अपमान आहे? हा अपमान पूर्ण गुजरातचा नाही का? गुजराती जनतेचा नाही का? देशातील दुर्लक्षित मागासलेल्या जातींचा हा अपमान नाही का? प्रचारादम्यान, मोदी केवळ हे प्रश्नच विचारून थांबलेले नाहीत, तर त्यांनी त्याला सांप्रदायिक मुलामाही दिला आहे. अय्यर यांचे वक्तव्य मंगोलियन संस्कृतीचे प्रतीक असल्याचे मोदी आपल्या भाषणांमधून ठासून सांगतायेत. अय्यर यांचे हे विधान काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तंबूत गडबड झाली नसती, तर नवले ठरले असते. काँग्रेसने अय्यर यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली, त्यांना बेदखलही केले. पण, काँग्रेस अय्यर यांचे आणखी काय वाकडे करणार, हा एक प्रश्नच आहे.
आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना अय्यर म्हणाले की, हिंदी त्यांची मातृभाषा नाही. त्यांना हिंदी शब्दांचे अर्थ निटपणे माहीत नाहीत. त्यांच्या निचा किस्म के आदमी या वाक्याचा अर्थ खालच्या जातीत जन्मलेला माणूस असा असेल तर माफी मागतो. पण या वाक्याचा अर्थ असा होत नाही. अय्यर यांना अभिप्रेत असलेला अर्थ त्यांनी जे म्हटले आहे तोच आहे. अय्यर यांना काय म्हणायचे आहे हे मोदींनी ओळखले आणि त्यांच्या वक्तव्याला खालच्या जातीतला हा अर्थ जोडून त्यांनी या सर्व प्रकरणाला निवडणुकीचा रंग दिला.हे राजकारण आहेच आणि चतुराईदेखील आहे. अय्यर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांनाही नालायक म्हणून संबोधले होते. नालायक शब्दाचा शब्दश: अर्थ अयोग्य असा होता. पण नालायक शब्दाचा प्रयोग शिवी म्हणून केल जातो. नीच किस्म का आदमी आणि नालायक हे दोन्ही शब्द शिवी म्हणून ओळखले जातात. हे माहीत करून घेण्यासाठी व्याकरण माहीत असायला पाहिजेच असे नाही. केवळ अय्यरच नाही इतर राजकारणी, पत्रकार व्यक्तिगत पातळीवर मोदी यांच्यासंदर्भात बोलताना जे शब्द, बिरुदं वापरत असतील त्याचा सार्वजनिकरीत्या उच्चार करणार नाहीत. हाच नियम राहुल गांधी यांच्याबाबतीतही लागू होतोच. हे दोन्ही नेते कसेही असले, तरी देशातील दोन सर्वात मोठ्या पक्षांचे नेते आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने वाटचाल करत असताना शाब्दिक वाक्युद्धाने कोणी घायाळ होणार नाही न याची काळजी सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे.आपल्याकडे एक म्हण आहे, तलवारीने केलेला वार एकवेळ भरून येईल. पण शब्दांमुळे झालेल्या जखमा कधीच बर्या होत नाही. काळाच्या ओघात ते सगळे मागे पडले, तरी त्याच्या वेदना कुठेतरी मनाला टोचतच असतात. लोकशाहीमध्ये विरोधात असून एकमेकांचा मान राखल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याच मार्गावर राजकारण्यांनी पुढे जायला पाहिजे.
– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9869448117