अरुण जेटली यांनी उधळली स्तुतीसुमने
पुणे । पद्मभूषण शरद पवारांचे काम हे राजकारण्याच्या पलीकडचे असून त्यांनी कायमच देशहिताला प्राधान्य दिले आहे. शेती आणि शेतकर्यांसाठी त्यांचे योगदान मोठे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम चांगल्या प्रकारे सुरु आहे, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जेठली बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी शरद पवार होते.
11 हजार विकासोंचे पुनरूज्जीवन
अरुण जेटली म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात जागतिक स्तरावर सुरु असणार्या पहिल्या महायुद्धाच्या कालावधीत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली. अशा कठीण काळात सुरु झालेल्या बँकेचे काम योग्य नियोजनामुळे चांगल्या प्रकारे सुरु आहे. या यशस्वीतेमागे संस्थेचा सचोटीचा व्यवहार कारणीभूत आहे. शेतकर्यांना कमी व्याजदराने पैसे देण्याचे काम या बँकेने केले आहे. देशातील ग्रामीण भागांना रस्त्यांनी जोडण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने हाती घेतले आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरात वीज पोहोचविण्याच्या कामालाही प्राधान्य देण्यात आले आहे. देशातील 55 टक्के जनता ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. सिंचन व्यवस्था हीच कृषी क्षेत्रासमोरील प्रमुख समस्या आहे. या सिंचन क्षेत्रावर केंद्र व राज्य सरकार अधिक खर्च करत असून सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.राज्यातील 11 हजार विविध कार्यकारी संस्थांना पुनर्जिवित करुन सहकार समाजाच्या तळापर्यंत नेण्यासाठी सरकारचे काम सुरू आहे. सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्तींवर अंकुश लावण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली असली तरी सहकारातील चांगल्या संस्थांच्यामागे सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाही देत येत्या ऑक्टोबरपासून शेतकर्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करून शेतकर्यांची दिवाळी गोड करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.