बारामती । कै. वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांनी साखरकारखानदारी वाढविली. मात्र शरद पवारांनी ती पार मोडीत काढली. आता उरलेसुरलेले सहकारी साखर कारखाने पवार विकण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात पवारांनी एकही साखर कारखाना काढलेला नाही. माळेगाव कारखान्याने ज्यादाच भाव दिलेला आहे. माळेगाव कारखाना रिकव्हरीनुसार राज्यात पहिल्यानंबरचा भाव देतो. मात्र शरद पवार यांना त्यांच्या खासगी साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकर्यांना लुटायचे आहे, अशी घणाघाती टिका माळेगाव कारखान्याचे जेष्ठ संचालक चंदरअण्णा तावरे व कारखान्याचे अध्यक्ष रंजनकाका तावरे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
7 नोव्हेंबरपासून गळीत हंगाम
माळेगाव कारखान्याचे आधुनिकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. गळीत हंगाम येत्या 7 नोव्हेंबरला सुरू करीत आहोत. बारामती तालुक्याच्या आमदारांनी बारामती, पणदरे, भिकोबानगर, कांबळेश्वर या गावामध्ये सत्कार उद्घाटनाचे निमित्त करून सभा घेतल्या. त्या सभांमध्ये माळेगाव कारखान्यास गेटकेन ऊस देऊ नका फक्त सभासदांचा आडसाली ऊस घ्यावा.
गेटकेन घेऊ लागल्यास काटा बंद पाडा, कारखाना बंद पाडा असे सांगितले. याचा समाचार घेताना रंजन तावरे म्हणाले, पवारांचे खासगी साखर कारखाने अत्यंत कमी भाव देतात. आम्ही त्यांच्यापेक्षा टनाला 400 रुपये जास्त भाव देतो. त्यामुळे पवारांना लुटायला संधी मिळत नाही. सभासद त्यांना ऊस देत नाही. मात्र माळेगावला मोठ्या प्रमाणात ऊस देतात. हे पवारांचे मुख्य दुखणे आहे.
…तर शेतकरी सुधारेल
शेतकर्यांच्या परिस्थितीची राज्यसरकारला चांगली जाणीव आहे. सरकार सहकारातील वाईट गोष्टी बाजूला करून सहकार स्वच्छ करत आहेत. हा सहकार स्वच्छ केल्यामुळे तळागाळातील ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी खर्या अर्थाने सुधारेल. मात्र पवारांना सहकारच विकायचा आहे व त्याबदल्यात खासगी कंपन्यांच्या दावणीला शेतकरी बांधायचा आहे. त्यामुळेच एकीकडे छत्रपती सोमेश्वर या कारखान्यांना गेटकेन घाला म्हणून सांगायचे आणि त्याचवेळी माळेगावने गेटकेन घेऊ नये, अशी लबाडीची भूमिका घ्यायची हेच पवारांचे राजकारण बनले आहे, असे तावरे यांनी सांगितले.
यंदा 9 लाख टन ऊसाचे गाळप
माळेगाव कारखान्याने अवघ्या साडेतीन महिन्यात कारखाना दुरुस्तीचे आव्हानात्मक काम चांगल्या दर्जाने पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे कोजनरेशन, मद्यार्क प्रकल्पाचेही कामही पूर्ण झालेले आहे. त्यामुळे यंदा 9 लाख टन ऊसाचे गाळप निश्चितपणे करेल व ऊस उत्पादक शेतकर्यांना चांगला भाव मिळेल, अशी स्पष्ट ग्वाही सहकारतज्ञ चंदरअण्णा तावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संग्रामसिंह काटेदेशमुख, संजय तावरे, राजाभाऊ देवकाते, दादासाहेब झांबरे, तसेच कारखान्याचे संचालक मंडळ आदी मान्यवर पत्रकार परिषदेला उपस्थित होते.