शरद पवारांनी हिंजवडीप्रश्‍नी कायमस्वरूपी तोडगा काढावा

0
नगरसेवक मयुर कलाटे यांनी केली मागणी
हिंजवडी : हिंजवडी येथे आयटी पार्कमध्ये आणि परिसरामध्ये रोजच वाहतूक कोंडी होत असते. पीएमपीएमएलच्या बस, स्थानिक रहिवाश्यांची वाहने, कंपन्यांंच्या गाड्या, कर्मचार्‍यांच्या खासगी गाड्या तसेच खासगी ट्रॅव्हल्सच्या मोठ्या गाड्या या सर्वांमुळे या वाहतूक कोंडीमध्ये वाढ होते आहे. अनेकदा पोलीस खात्याला निवेदन देऊनही काही उपाय योजना झाली नाही. मात्र नवीन पोलीस आयुक्तालय झाल्यावर आयुक्तांनी चक्राकार वाहतूक सुरू केली आहे. तसेच कर्मचार्‍यांना आणि रहिवाश्यांना या वाहतूक कोंडीवर आपली मते आणि सुचना मागवल्या होत्या. त्यामुळे शरद पवार यांनी या वाहतूक कोंडीवर प्रभावी व दीर्घकालीन तोडगा काढावा, अशी मागणी नगरसेवक मयुर कलाटे व शिष्टमंंळाने निवेदनाद्वारे केली. यावेळी हिंजवडी ग्रामपंचायतीचे सदस्य, माजी सरपंच सागर साखरे, श्रीकांत जाधव आदी उपस्थित होते. या शिष्टमंडळाने शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे आपली मागणी केली.
मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक
याबाबत नगरसेवक मयुर कलाटे यांनी सांगितले की, शरद पवार हे हिंजवडी आयटी पार्कचे शिल्पकार आहेत. त्यांच्या दुरदृष्टीमुळे हिंजवडीचे नाव सर्वत्र होत आहे. त्यामुळे त्यांना या समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली. त्यावेळी पवार यांनी या वाहतूक कोंडीबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले. हिंजवडीतील वाहतूक समस्या, अतिक्रम आदी प्रश्‍नांवर यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, पी.एम.डी.आर. व एम.आय.डी.सी.चे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासनातील मुख्य अधिकारी, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, आय.टी.पार्कचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक आदी उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीतून काहीतरी ठोस व दीर्घकालीन तोडगा काढण्यात येईल, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला.