शरद पवार समाज परिवर्तनाचे मार्गदर्शक

0

हडपसर । देशातील मोजकीच अशी काही माणसे आहेत की कुठल्याही क्षेत्रात गेले तर त्यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते ते म्हणजे शरद पवार. पद आणि पदाशिवाय समाजकारण करणारे, नव्या संकल्पना रूढ करणारे ते लोकनेते आहेत. 50 वर्ष राजकारणात राहून समाजाच्या अपेक्षा ओळखून ते कायम परिवर्तनशील राहिले. अनेक गोष्टी एकत्र करून प्रवाह निर्माण केला. समाजासाठी 100 वर्ष पुढे जाऊन धोरणात्मक निर्णय घेणारे म्हणजे पवार. महिलांना राजकारणात 33 व संपत्तीत 50 टक्के वाटा दिला. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, परदेशी भांडवल गुंतवणुकीचा निर्णय पवार यांनी घेतला. व्यावहारिक, दूरदृष्टीकोनातून जगाचा अभ्यास करणारे, तसेच शिक्षण क्षेत्रात ज्ञान उपयोजनात आणण्यासाठी शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्याचे महत्वपूर्ण काम शरद पवार यांनी केले, असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी मांडले.रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या साधना शैक्षणिक संकुलाच्या वतीने कर्मवीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. ही व्याख्यानमाला 19 ते 21 डिसेंबर या कालावधीत हडपसरमधील एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पार पडली. या व्याख्यानमालेत ते बोलत होते.

व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प
रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे यांच्या या व्याख्यानमालेचे द्वीतीय पुष्प गुंफण्यात आले. मगरपट्टा सिटीचे संचालक मंगेश तुपे, प्राचार्य. डॉ. अरविंद बुरुंगले, उपप्राचार्य. डॉ. अशोक धुमाळ, संजय मोहिते, पुष्पलता देशमुख, दीपिका जोशी, दिनकर साठे, रयत संकुलातील सर्व शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक संजय मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ. सरोज पांढरबळे यांनी तर आभार प्रा. शेटे यांनी मानले.

सर्वसामान्यांचे कल्याण जपणारे राजे
देशातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी, तज्ज्ञांनी, संशोधकांनी, अभ्यासकांनी सर्वसामान्यांनी दखल घ्यावी, असा लोकनेता म्हणजे शरद पवार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी 73 व 74 वी घटना दुरुस्ती, निर्णय क्षमता, प्रशासकीय कौशल्य, ज्ञान हे सदगुण त्यांच्याकडे आहेत. शैक्षणिक व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन, शेतकर्‍यांचे प्रश्‍न यांच्यात जातीने लक्ष घालणारा लोकनेता आहे. सर्वसामान्यांचे कल्याण करणारे ते जाणते राजे आहेत, असे दिलीप (आबा) तुपे यांनी अध्य सांगितले.