‘शरद युवा’मुळे युवकांच्या स्वप्नांना आकार

0

सुनेत्रा पवार : पवार चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित शरद युवा महोत्सवाचे उद्घाटन

इंदापूर : शरद युवा महोत्सवाला युवकांचा प्रंचड प्रतिसाद मिळत आहे. युवकांच्या स्वप्नांना आकार देण्याचे काम शरद युवा महोत्सव करत असतो. स्पर्धा हा केवळ बहाणा असून युवक-युवतींचा मेळा आम्हाला जास्त भावतो. जिंकण हारणं सुरू राहील, परंतु खिलाडुवृत्तीने सहभागी होणे महत्त्वाचे. युवा कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्यामुळे भविष्यात झी मराठी वाहिनीवरील अजिंक्य, शितल यासारखे अनेक कलाकार उदयास येतील, याचा आम्हाला आनंद होत असल्याचे मत बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. पवार चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित शरद युवा महोत्सवाचे उद्घाटन सुनेत्रा पवार, आमदार दत्तात्रय भरणे, झी मराठी वाहिनीवरील लागीर झालं जी मालिकेतील आघाडीचे कलाकार अजिंक्य व शितल, पुणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने यांच्या हस्ते झाले. सूचना फलकावर युवा पिढीसाठी आपला मोलाचा संदेश लिहून उद्घाटन केले. त्यावेळी सुनेत्रा पवार बोलत होत्या.

स्वप्न सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करा

शितल ही जर्मन भाषा स्पेशालीस्ट आसुन अगोदर ती खासगी कंपनीमध्ये जर्मन भाषा स्पेशालिस्ट म्हणून काम करत होती. झी मराठीच्या मालिकेसाठी निवड झाल्यानंतर ग्रामीण भाषा शिकण्यासाठी सातारा येथे एक महीना ट्रेनिंग घेतल्याचे तिने सांगितले. युवक व युवतींनी भविष्याचे स्वप्न बघताना ते सत्यात उतरविण्यासाठी स्वत:मध्ये क्षमता ठेवावी, असे शितलने पुढे सांगितले. यावेळी झी युवा वाहिनीवरील जेजुरी येथील प्रथमेश मोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अशोक घोगरे, वर्धमान शहा, वैशाली नागवडे, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, हेमलता माळुंजकर, विठ्ठल ननवरे, श्रीधर बाब्रस, राजश्री मखरे, रहेना मुलाणी, उमा इंगोले, अप्पासाहेब पवार, अशोक चोरमले, वसंत आरडे, अरबाज शेख याप्रसंगी उपस्थित होते.

… पुन्हा कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घ्यावेसे वाटते

शरद युवा महोत्सवातील युवा युवतींची प्रचंड गर्दी व उत्साह पाहून मलासुद्धा कॉलेजमध्ये नवीन अ‍ॅडमिशन घ्यावेसे वाटते आहे, असे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मी माझ्या करिअरची सुरूवात शाळा कॉलेजमधील विविध स्पर्धा, नाटक, गॅदरींग अशा कार्यक्रमात सहभागी होऊन केली, असे अजिंक्यने सांगितले. एम. एस्सी. आयटी झालेला अजिंक्य अगोदर एका खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याची स्वत:ची डान्स अकॅडमी सातारा येथे असून त्याचे शिक्षणही सातार्‍यातच झाल्याचे त्याने पुढे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रस्तावीक महारूद्र पाटील, सूत्रसंचालन पुजा थिगळे हीने केले तर आभार वैशाली नागवडे यांनी मानले.