मुंबई । मुंबापुरीतील षणमुखानंद सभागृहात यंदाची तळवळकर क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धा रंगणार आहे. सामजिक,सांस्कृतीक कार्यक्रमाव्यतिरीक्त या सभागृहात पहिल्यांदाच होत असलेल्या अखिल भारतीय पातळीवरील शरीरसौष्ठव यजमान महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवपटूंसमोर रेल्वेचे कडवे आव्हान असणार आहे. येत्या 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी रंगणार्या या स्पर्धेत प्रथमच रॅकेट खेळांप्रमाणे मिश्र दुहेरीतील जोड्या आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करणार आहेत. तळवळकर बेटर वॅल्यू फिटनेस आयोजित या शरीरसौष्ठव स्पर्धेत देशातील आघाडीच्या 30 शरीरसौष्ठवपटूंना प्रवेश देण्यात आला आहे. नुकत्याच मंगोलिया येथे झालेल्या मि.वर्ल्ड स्पर्धेत सुवर्ण पटकावणारा महाराष्ट्राचा महेंद्र चव्हाण, सलग दोनवेळा भारत श्री काबिज करणारा सुनीत जाधव, मि. आशियाचा तीनवेळा मानकरी ठरलेला बॉबी सिंग,गतविजेता राम निवास, सागर जाधव, जगदीश लाड, अक्षय मोगरकर,रोहित शेट्टी आदी शरीरसौष्टवपटू आव्हान देतील असे भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी सांगितले. भारतीय शरीरसौष्ठवाची खरी ताकद असलेले रेल्वे आणि महाराष्ट्राचे खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. त्याखेरीज ओडिशा, दिल्ली, तामीळनाडू, हरयाणा, उत्तर प्रदेशचे स्टार तळवलकर क्लासिकच्या टॉप टेनमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
सर्वात मोठ्या पारितोषीक रकमेची स्पर्धा
तळवलकर क्लासिक ही सर्वात श्रीमंत स्पर्धा ठरणार आहे. 20 लाखांची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत विजेता 6 लाखांचा मानकरी ठरेल. टॉप टेनवर बक्षीसांचा पाऊस पाडला जाणार असून उपविजेता 3 लाखांचा तर दहावा क्रमांक 50 हजारांचा धनी होईल. मिश्र जोडींच्या या स्पर्धेत विजेती जोडीही लखपती होईल अशी माहिती आयोजकांनी दिली.