शशी थरूर यांनी पातळी सोडली

0

नवी दिल्ली : मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड म्हणून निवडली गेल्यानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केलेल्या ट्वीटने थरूर अडचणीत सापडले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने थरूर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या, ज्या तरुणीने भारताचे नाव जगात उंचावले तिचा अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. थरूर यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते, हमारी तो चिल्लर भी मिस वर्ल्ड बन गई. थरूर यांच्या या ट्वीटनंतर नेटीझन्सने थरूर यांचा चांगलाच समाचार घेतला.

माफी मागीतली
थरूर यांनी या ट्वीटद्वारे मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर हल्ला चढवला होता. त्यांनी ट्वीट केले की, नोटबंदी एक चूक होती. भाजपला हे समजायला हवे की, आपली कॅश जगावर राज्य करते. अगदी आमची चिल्लरही मिस वर्ल्ड बनली आहे. सुट्या पैशांना बोलीभाषेत चिल्लर म्हणत असल्याने थरूर यांनी शब्दाचा वापर केला. यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या, आम्ही आधी थरूर यांना समन्स पाठवण्याच्या विचारात होतो, पण त्यांनी माफी मागितली. फक्त माफी मागणे योग्य नाही. ते माफी मागून लोकांना शांत राहायला सांगत आहेत, असे वाटते. ज्या तरुणीने भारताला सन्मान मिळवून दिला, तिचाच अपमान केला जात आहे.

संतप्त पडसाद
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी या ट्वीटवर आक्षेप घेतला. तुमची पातळी एवढी कशी घसरली, असा सवाल खेर यांनी केला. एक यूझर म्हणाला, छिल्लर हा एक शूर समाज आहे, त्याची खिल्ली उडवू नका. तुम्ही थरूर आहात, थोर नाही. सोशल मीडियावर होत असलेल्या विरोधानंतर थरूर यांनी ट्वीट करून माफी मागितली व नेटीझन्सना शांत होण्याचे आवाहन केले. दरम्यान, मानुषी छिल्लर हिनेदेखील थरूर यांना अतिशय समर्पक उत्तर दिले. माझ्या आडनावात चिल्लर शब्द असला तरी चिल सुद्धा आहे, असे तिने म्हटले आहे.