शहरातील अवैध धंदे बंद करा

0

चाळीसगाव । शहरातील अवैध धंद्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात अवैध धंद्यांना उत आले आहे. शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. व्यवसाय व उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. गुन्हेगारीचे देखील प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. चाळीसगाव शहर व तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून हे अवैध धंदे त्वरीत बंद करावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या धंद्यांवर ठोस कारवाई न झाल्यास 8 दिवसात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

मद्य विक्री जोरात
चाळीसगाव तालुका हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. या तालुक्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षकांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि चाळीसगाव शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. सट्टा, मटका, जुगार आदी धंदे सुरु आहेत. तंबाखू जन्य पदार्थ गुटखा यांची शहरात विक्री होत आहे त्यांचे वर कारवाई झालेली दिसून येत नाही. राज्यभरात दारुबंदीचा विषय गाजत असतांना शहरात मद्यविक्री जोरात होत आहे.

आंदोलनाचा इशारा
शहरात गजबजलेल्या वस्तीत शाळा, महाविद्यालय परिसरात धंदे सुरु आहेत. या प्रकाराला आळा बसावा अवैध धंद्यांवर ठोस कारवाई न झाल्यास 8 दिवसात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अवैध धंद्यांना उत आल्याने तरुणाई भरकटली आहे. तरुणांई रोजगार उपलब्ध नसल्याने ते बेरोजगार आहे. काही कमवत नसतांना त्यांच्याकडून अमाप खर्च केला जात आहे. पोलीस प्रशासनाने यावर निर्बध घालावा अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र पोलीस प्रशासन ठोस पावले उचलतांना दिसत नाही.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतांना नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष शाम देशमुख,भगवान पाटील, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, चितेगाव सरपंच अमोल भोसले, नगरसेवक सुर्यकांत ठाकुर, अनिल जाधव, जगदीश चौधरी, उपाध्यक्ष निरज अजबे, शुभम पवार, विद्यार्थी तालुकाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर,देवेंद्र राजपूत,कुशल देशमुख, सौरभ त्रिभुवन, गौरव पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रकाश पाटील, अभिलाष एसके, योगेश पाटील, शुभम मोहीते, ऋषीकेश देशमुख, गुंजन देशमुख, एजाज शेख,सुशांत पाटील,दिपेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.