भुसावळ। शहरात औद्योगिक वसाहतीचा प्रश्न, दीपनगर येथे प्रकल्पग्रस्त तरुणांना रोजगाराचा प्रश्न कायम आहे. औद्योगिक प्रकल्प सुरु झाल्यास तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन बेरोजगारी कमी करता येऊ शकते. याबाबत शासनदरबारी प्रयत्न करण्यात येईल, तसेच शासनाने याची दखल न घेतल्यास वेळप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घेराव घालण्यात येईल अशा इशारा लोकजनशक्ती पार्टीचे युवा सचिव महेंद्र पाटील यांनी दिला.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सचिवपदी नियुक्ती
लोकजनशक्ती पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्ली येथे झालेल्या बैठकीत महेंद्र पाटील व संजय कदम यांसह चार जण दिल्लीला रवाना झाले होते. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या उपस्थितीत युवा प्रदेशाध्यक्ष मोहन अनमोल यांनी महेंद्र पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव म्हणून नियुक्ती केली असल्याची माहिती यावेळी प्रकाश केर्हाळकर यांनी दिली.
शासकीय योजनांची माहिती गरजेची
आगामी वाटचालीसंदर्भात स्पष्ट करताना महेंद्र पाटील म्हणाले की, युवाशक्तीचे वर्गीकरण करणे, उच्चशिक्षीत, सामान्य, कुशल व अकुशल कामगारांची कार्यक्षमता, योग्यता यांचे वर्गीकरण करणे, त्यांची क्षमता पाहून योग्य प्रकारचे शिक्षण मिळवून देणे तसेच शासकीय योजनांची माहिती पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
युवा आयोगाची स्थापना
देशातील तरुणांसमोर सद्यस्थितीत बेरोजगारीची मोठी समस्या असून तीचे निवारण करण्यासाठी युवाशक्तीला सकारात्मक दिशा देण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करुन युवा आयोगाची स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती लोकजनशक्ती पार्टीचे युवा सचिव महेंद्र पाटील यांनी दिली. ते शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रकाश केर्हाळकर, अजय नरवाडे, उमेंद्र वाकचौरे, मधुकर इंगळे आदी उपस्थित होते.