दुसर्या ताब्यातील कंपनी हस्तांतरीत करुन भरविली शाळा ; भुसावळच्या सहा जणांविरोधात गुन्हा
जळगाव- ताब्यात नसलेली मिळकत ताब्यात असल्याचे दर्शवून नावाने हस्तांतरीत करण्यासाठी 30 लाख 45 हजारात उद्योजकाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयितांकडून उडवाउडविची उत्तरे मिळत असल्याने भुसावळ येथील अग्रवाल कुटूंबांच्या 6 जणांविरोधात रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पटेल नगरातील रविंद्र मुरलीधर अत्तरदे यांची जळगाव औद्योगिक वसाहतीत स्टारग्लेस प्रेसीटेज प्रा.लि कंपनी असून शेजारील कारखान्यासाठी जागेची आवश्यकता होती. याबाबत भुसावळ शहरातील कैलास रामेश्वर अग्रवाल यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांना मिळाली. अग्रवाल कुटूंबियांनी अत्तरदे यांची भेट घेतली. एमआयडीसी येथील एफ 28 अमील स्टिल रोलींग मिळकत विक्री करावयाची सांगितले. ती मिळकत स्वतःच्या ताब्यात असल्याचेही त्यांनी अत्तरदे यांना पटवून दिले.
नोटीस प्रसिध्द करुन जागा, कंपनीही दाखविली
अग्रवाल कुटूंबियांनी अत्तरदे यांना अमील स्टिल रोलींगची जागा तसेच प्रत्यक्ष बांधकाम दाखविले. हस्तांरणासाठी अॅड. जी.टी.भंगाळे या वकीलामार्फत सदर मिळकतीची जाहीर नोटीसही एका वृत्तपत्रातून प्रसिध्द केली. यानंतर विश्वास बसल्याने अत्तरदे यांनी अग्रवाल कुटूंबियांना कंपनीत बोलावून सुरुवातीला 11 लाख रुपयांचा चेक व रोख 10 लाख रुपये दिले. यानंतर परवानगीसाठी आवश्यक 9 लाख 45 हजाराची रक्कम अत्तरदे यांनी भरली. अत्तरदे यांच्या स्टारग्लेज प्रा.लि. यांच्या नावाने हस्तांतरण करण्यासाठी एमआयडीसीने ना हरकत दाखलाही दिला. व सदरची कंपनी हस्तांतरीत केली. मात्र प्रत्यक्षात मिळकत अजय रामेश्वर अग्रवाल यांची असल्याचे समोर आले. यानंतर अग्रवाल कुटूंबियांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाली. याप्रकरणी अत्तरदे यांच्या फिर्यादीवरुन कैलास रामेश्वर अग्रवाल, संगीता अग्रवाल, बिना अग्रवाल, विजया सुरेश अग्रवाल, विजय रामेश्वर अग्रवाल, सतिष अग्रवाल यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास रामकृष्ण पाटील करीत आहेत.