593 मोबाईल टॉवर्सकडे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत एकूण 593 मोबाईल टॉवर्स आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या टॉवर्सकडून थकबाकी येणे बाकी आहे. ही रक्कम तब्बल 16 कोटी 63 लाख रुपये एवढी आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागच्यावतीने त्यांच्याकडून कर आकारणी सुरु करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण 16 विभागीय कार्यालयांच्या वतीने हद्दीतील टॉवर्सची चालू आर्थिक वर्षात माहिती संकलित करण्यात आली आहे. याकरिता प्रशासन अधिकारी आणि महसूल विभागाच्या सहाय्यक मंडलाधिकारी यांची मदत घेण्यात आली आहे. यामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये अनेक मोबाईल टॉवर्स अनधिकृत असल्याची बाबदेखील समोर आली आहे.
अनधिकृत टॉवर्सची उभारणी
शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचा विषय ऐरणीवर आला असून, महापालिकेची अथवा महसूल विभागाची कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता अनेक मोबाईल टॉवसची उभारणी करण्यात आल्याच्या महसूल व महापालिका प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय या टॉवर्समधून बाहेर पडणारे रेडीएशन मानवी आरोग्यास हानीकारक असल्याचा समज असल्याने, या टॉवर्सला परिसरातील रहिवाशांचा वाढता विरोध आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे टॉवर्स उभारलेल्या जागा मालकाला दर महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असताना, या जागा मालकांकडून व्यावसायिक परवानगी घेतली जात नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे महापालिका व महसूल विभागाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याने, या दोन्ही विभागांना याचा कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सोळा विभागीय कार्यालयांतर्गत घेतलेल्या आढाव्यात निगडी विभागीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 72 मोबाईल टावर्स आढळून आले आहेत. त्याखालोखाल सांगवी भागात 61 मोबाईल टॉवर्स आहेत. तिसर्या क्रमांकावर भोसरी विभागीय कार्यालयाचा क्रमांक लागला आहे. या विभागात 56 मोबाईल टॉवर्स आहेत.