नवी मुंबई । बिल्डरवर खोटा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याचे प्रकरण नवी मुंबई पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले असून यात पोलिसांची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे.अत्यंत गंभीर प्रकरण नियमबाह्य व निष्काळजीपणे हाताळल्याप्रकरणी तुर्भे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली असून पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी ही कारवाई केली आहे. तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय यादव यांच्यावर पोलीस आयुक्तांनी यापूर्वीच प्रशासकीय कारवाईअंतर्गत निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय यादव यांच्यासह या कटात सहभागी असलेले बिल्डर केतन चुग, सुनिल भानुशाली आणि सन्नी लाहोरीया यांच्यावर तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आणखी काही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये दाखल केलेले गुन्हे खोटे असल्याची तक्रार मेट्रो डेव्हलपर्सचे संचालक सुरेश जैन यांनी पोलीस आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गुन्हे शाखेला दिले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने केलेल्या तपासात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अनेक त्रृटी आढळुन आल्या होत्या. सुरेश जैन यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचे तसेच पोलीस उपनिरीक्षक संजय यादव यांच्यासह या कटात सहभागी असलेल्या अन्य बिल्डरांनी सुरेश जैन यांच्याकडे या गुन्ह्यातुन सुटका हवी असल्यास 5 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचेही तपासात उघड झाले होते.
अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल होणार
त्यामुळे खोट्या प्रकरणात सुरेश जैन यांना बेकायदेशीरपणे अटक करणारे पोलीस उपनिरीक्षक संजय यादव व त्यांच्या अन्य साथिदार बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय यादव यांच्यासह या कटात सहभागी असलेले केतन चुग, सुनिल भानुशाली, सन्नी लाहोरीया यांच्यावर शनिवारी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणी मागणे, धमकावणे, मारहाण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय यादव व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी बांधकाम व्यावसायिक सुरेश जैन यांच्यावर गुन्हा दाखल करताना गुन्ह्यासंबधीच्या कागदपत्रांची पडताळणी न करता, फिर्यादींना फायदा होण्याच्या दृष्टीने व त्यांच्या सांगण्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच या गुन्ह्याच्या तपासात गंभीर अनियमितता केल्याचे आढळुन आल्यामुळे या दोघा पोलीस अधिकार्यांवर पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
अभय असल्याचा आरोप
हे प्रकरण बेजाबदारपणे हाताळल्याप्रकरणी सीआरपीसी कलम 110 फिर्यादीला नियमबाह्य रित्या लावून चुकीची कारवाई केल्याबद्दल तुर्भे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, खोटे गुन्हे दाखल प्रकरणात नवी मुंबईतील आणखी काही उच्चपदस्थ पोलीस अधिकार्यांचा समावेश असल्याचा आरोप फिर्यादी सुरेश जैन यांनी केला आहे. एखाद्या आरोपीला अटक करावयाची असल्यास त्या विभागाच्या पोलीस उपायुक्तांची लेखी परवानगी घेणे संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना बंधनकारक असते. त्यामुळे या प्रकरणात कुठल्याही प्रकारचे साक्षी पुरावे व कागदपत्रांची शहानिशा न करता पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या परवानगीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित पोलीस उपायुक्तांवर राज्याच्या पोलीस महासंचालकांचा वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांवर कारवाई न करता कनिष्ठ पोलीस अधिकार्यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप फिर्यादीकडून करण्यात येत आहे.