नवी मुंबई । मुंबईतील कमला मिल आग प्रकरणानंतर राज्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. लवकरच सर्वत्र कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. शहरातील अनेक पब, बार व रेस्टॉरंट मालकांनी सर्व नियम पायदळी तुडवून ग्राहकांना भुरळ घालता येईल असा साज आपल्या हॉटेलवर चढवल्याने लवकरच अशा हॉटेल मालकांना शासनाच्या अतिक्रमण विभागाचा फटका बसणार आहे, तर त्याचबरोबर पोलिसांचीही अश्या पब, बार व रेस्टॉरंटवर करडी नजर राहणार आहे. मुंबईतील ‘मोजो पब’मध्ये लागलेल्या आगीत तरुणांच्या मृत्यूच्या घटनेनंतर नवी मुंबईतील वाशी सेक्टर-30 मधील ‘मोजो पब’वर पोलिसांची करडी नजर आहे. या पब वर यापूर्वी ही अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. त्यानंतरही पुन्हा या पबमध्ये बेकायदा अतिक्रमण करण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती. मागील दोन वर्षांत मुंबई आणि नवी मुंबईत ‘पब संस्कृती’ वाढीस लागली असून बेलापूर सेक्टर-11 मध्ये अनेक पब सुरू झाले आहेत. वाशी, बेलापूरप्रमाणेच कोपरखैरणे आणि नेरुळमध्येही ही संस्कृती वाढली आहे. आजवर शहरात छोटे-मोठे 22 पब सुरू झाले आहेत. स्थानिक पोलिसांशी सौहार्द असल्याने पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची चर्चा आहे. वाशी रेल्वेस्थानकाबाहेरील एका इमारतीत ‘मोजो पब’ आहे.
ग्राहक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
खुल्या टेरेसवर मद्य मेजवान्यांदरम्यान पबमध्ये आठवडयातून तीनदा आगीचे खेळ खेळले जातात. त्यामुळे येथील ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाशातील एक प्रसिद्ध पार्श्ववगायक यांचा मुलगा, उत्तर प्रदेशातील एका उच्च पोलीस अधिकार्याचा मुलगा आणि नागपूरमधील एका बडया व्यावसायिकाचा मुलगा अशा तिघांची पबमध्ये भागीदारी आहे.
मुंबईतील पबसाठी मोकळ्या जागेचा वापर करताना लाकडी सामान छतासाठी वापरण्यात आले होते. त्यामुळे येथील पबला लागलेली आग लवकर पसरल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवी मुंबईतील पब, रेस्टॉरन्ट, हॉटेल यांच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेल्या लाकडे बांबू आणि त्यावरील प्लास्टिक छताविषयी निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
नेरुळ येथील हावरे मॉलमध्येही एक पब नव्याने सुरू झाला आहे. वाशी सेक्टर 19 मधील सतरा प्लॉझा ही इमारत तर पब आणि रेस्टॉरन्टसाठीच प्रसिद्ध झाल्याने पब प्लाझा म्हणून प्रसिद्धीला आली आहे. कोपरखैरणे सेक्टर 16 येथील एका प्रसिद्ध लेडीज बारच्या वरील इमारतीच्या मोकळ्या जागेत एक पब इमारतीतील रहिवाशांची डोकेदुखी ठरली आहे. लेडीज बार आणि इंधन भेसळीत प्रसिद्ध असलेली नवी मुंबईत आता पब संस्कृतीसाठी प्रसिद्ध होऊ लागली आहे. अनेक वेळा आयुक्तांच्या निर्देशावरून हॉटेल धारकांवर कारवाई करण्यात येत असली तरी याकडे हॉटेल मालक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले.