शहरातील फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्ता पुन्हा दुहेरी होण्याची शक्यता

0

पुणे । एकेकाळी सायकलचे शहर म्हणून नावाजलेल्या पुणे शहरात पुन्हा एकदा सायकलला गतवैभव मिळवून देण्यासाठी पुणे महापालिकेने पुणे सायकल प्लॅन तयार केला असून, त्यात सायकलस्वारांना रस्त्यावरून सुरक्षितपणे सायकल चालविता यावी, यासाठी अनेक प्रस्ताव दिले आहेत़ त्यात दोन लेनपेक्षा अधिक मोठे रस्ते पुन्हा दुहेरी करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे़ त्यात प्रामुख्याने फर्ग्युसन रस्ता आणि जंगलीमहाराज रस्त्याचा समावेश आहे़

फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्ता हे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आठ वर्षांपूर्वी तेथील वाहतूक एकेरी करण्यात आली़ हे करताना प्लॅन तयार करण्यात आला होता़ बस, सायकलसाठी स्वतंत्र मार्गाची आखणी आजवर झाली नाही़ त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांचा वेग वाढला़ सायकलस्वार आणि पादचार्‍यांसाठी तो धोकादायक ठरू लागला आहे़ पुणे सायकल प्लॅनमध्ये याचा विचार करण्यात आला आहे़

वेग 30 किमीपेक्षा कमी नसावा
शहरातील वाहतुकीचा वेग हा 20 ते 30 किमीपेक्षा अधिक नसावा़ सायकलस्वारांसाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था नाही अशा रस्त्यांवर असा वेग धोकादायक ठरतो़ त्यामुळे हे रस्ते पुन्हा दुहेरी करणे आवश्यकच आहे़ महापालिकेच्या सायकल प्लॅनमध्ये फर्ग्युसन व जंगलीमहाराज रस्ता दुहेरी करण्याचा प्रस्ताव आहे़ त्यावर त्यांनी लोकांची मते मागविली होती़ ती आम्ही दिली आहेत़ कोणत्याही योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी केली तरच त्याचे फायदे सर्वांना मिळू शकतात़ पण, महापालिकेकडून त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही़ या सायकल प्लॅनची पूर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे़, असे सजग नागरिक मंचच्या जुगल राठी यांनी सांगितले.

पालिकेने मागवल्या सूचना
एकेरी मार्गावर दुचाकी व अन्य वाहनांचा वेग वाढतो़ त्यातून सायकलस्वारांना दोन पेक्षा अधिक लेन असलेल्या रस्त्यावर उजवीकडे वळणे धोकादायक ठरत आहे़ अशा रस्त्यांवर पादचार्‍यांना रस्ता ओलांडणे कठीण होऊन बसते़ त्यामुळे सायकल व पादचार्‍यांसाठी असे रस्ते सुरक्षित नसल्याने हे दोन्ही रस्ते दुहेरी करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे़ या प्रस्तावावर महापालिकेने लोकांच्या सूचना मागवल्या होत्या़ त्यानुसार आता त्यावर पुढे विचार करून अंतिम प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे़

पार्किंगमुळे रस्ते झाले छोटे
एकेरी रस्ता करण्याचे फायदे खूपच तात्पुरते ठरले़ फर्ग्युसन रस्त्यावर मोटारींना पार्किंगसाठी जागा देण्यात आली़ त्यामुळे पूर्वी जेवढा रस्ता वाहनांना मिळत होता, तितकाच रस्ता आता वाहनांना उपलब्ध होत आहे़ जंगलीमहाराज रोडवर सध्या फूटपाथ मोठा करण्याचे काम सुरू आहे़ पादचारी सुरक्षा प्रकल्पांतर्गत हे काम सुरू आहे़ या रस्त्यावर आता त्याच्या पुढे वाहने पार्क केली जात असल्याने हाही रस्ता आता वाहनांसाठी कमी उपलब्ध होऊ लागला आहे़