शहरातील बड्या रुग्णालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट

0

धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडून ठोस उपाययोजना

पुणे : शहरातील बड्या रुग्णालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. आम्ही रुग्णालयाचे स्वयंसेवक आहोत, तुम्हाला चांगले उपचार मिळवून देतो पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड असेल तर तुमचे निम्मे बिल कमी करून देतो एवढच नव्हे तर थेट मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून निधी मिळवून देतो अशी आमिषे रुग्णांच्या नातेवाईकांना दाखवून स्वत:ची पोळी भाजून घेणार्‍या एजंटचा सुळसुळाट झाला आहे. त्यावर धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने ठोस पाऊले उचलत, अशाप्रकारचे आमिष दाखवून कोणी पैसे मागत असेल तर त्यांना बळी पडू नका, असे आवाहन सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी केले आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात धर्मादाय सह आयुक्त कार्यालयांतर्गत जवळपास 56 छोटे-मोठे रुग्णालय येतात. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या रुग्णाला चांगल्या रुग्णालयामध्ये उपचार मिळावे, रुग्ण लवकर बरा व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र, मोठ्या रुग्णालयांमधील बिलाचा आकडा डोळ्यासमोर आल्यावर मनात धडकी भरते. त्यामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून या रुग्णालयांवर अंकुश ठेवला जातो. गरीब किंवा सर्वसामान्य रुग्णाला अल्पदरामध्ये उपचार मिळावे यासाठी धर्मादाय कार्यालयाकडून संबंधित रुग्णालयाला सूचना दिल्या जातात. धर्मादायकडून पत्र मिळाल्यावर रुग्णाला मोफत किंवा अल्पदरात उपचार मिळतात. परंतु, ग्रामीण भागातून येणार्‍या काही रुग्णांना याबाबत कल्पना नसते. अशा व्यक्तींना हे एजंट गाठतात आणि अनेकप्रकारची आमिष दाखवून तुमचे एवढे काम केले ना आता आमचे कमीशन द्या’ असे म्हणून पैसे उकळतात. गेल्या काही महिन्यांत या एजंटबाबत अनेक तक्रारी धर्मादाय कार्यालयाकडे आल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन उपायुक्त नवनाथ जगताप यांनी सर्व धर्मादाय रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. रुग्णालयात येणार्‍या रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांशिवाय अन्य कोणालाही दाद देऊ नका. गरीब व सर्वसामान्य रुग्णांच्या माहितीसाठी प्रशासनाने स्वतंत्र कक्ष सुरू करावा, जेणेकरून नातेवाईकांचे हेलपाटे कमी होतील.

प्रशासनाकडे तक्रार करा

धर्मादाय रुग्णालयामध्ये मोफत किंवा अल्पदरात उपचार मिळण्यासाठी कोणाचीही शिफारस लागत नाही. नातेवाईकांनी सर्व कागदपत्रे धर्मादाय कार्यालय किंवा रुग्णालय प्रशासनाकडून नेमण्यात आलेल्या कक्षामधील स्वयंसेवकाला दिले तरीही संबंधित रुग्णाला त्याचा लाभ मिळू शकतो. परंतु, शहरातील काही रुग्णालयांमध्ये आमिषे दाखवून पैसे घेणार्‍या एजंटबाबत तक्रारी आल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत, त्यांच्या बळी न पडता, एजंटकडून जबरदस्तीने पैसे घेण्याचा प्रयत्न झाला तर तत्काळ प्रशासन किंवा धर्मादाय कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहन धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी केले आहे.