पुणे । मुख्यमंत्र्यांच्या इशार्यानंतर पुण्यातील भाजपचे आमदारही कामाला लागले आहेत. पुण्यात पक्षासाठी धोकादायक स्थिती नसतानाही आमदारांची धावपळ पाहून कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
आणखी दोन वर्षांनी 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यादृष्टीने पक्षाने सर्वेक्षण केले, त्यात 39 आमदार आणि 7 खासदार धोक्याच्या स्थितीत आहेत,असा निष्कर्ष निघाला आहे. लोकसभेत 320 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपने निश्चित केले आहे. उत्तर प्रदेशाखालोखाल महाराष्ट्रात जास्त जागा जिंकणे भाजपसाठी आवश्यक आहे. महाराष्ट्रात 7 खासदार आताच पराभवाच्या छायेत दिसू लागले आहेत. त्याची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी तर बैठक घेऊन स्पष्ट इशारा दिला आहे की, कामाला लागा अन्यथा नवे उमेदवार दिले जातील. यामुळे आमदार गडबडले असून कामाला लागले आहेत.
व्यापार्यांमध्ये सरकारविरोधात असंतोष
पुण्यात भाजपला 100 टक्के यश मिळाले आणि 8 आमदार निवडून आले. पण तेव्हाच्या निवडणुकीतील वातावरण 2019 पर्यंत असेच टिकून राहील का? या शंकेने त्यांना घेरले आहे. पुण्यातील व्यापारी वर्ग भाजपच्या मागे 100 टक्के होता. केंद्रशासित भाजप सरकाने सतत व्यापार्यांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी वर्गात नाराजी आहे. त्यामुळे सरकारविरोधात ते असंतोष व्यक्त करीत आहेत. याकरीता पक्षाने व्यापारी आघाडी, व्यापारी कार्यकर्ते, नगरसेवक यांना सक्रीय केले आहे. पुण्यातील 8 पैकी 2 विधानसभा मतदारसंघात व्यापारी मते निर्णायक आहेत. शिवाय निधी संकलन हाच वर्ग करतो हेही लक्षात घ्यावे लागेल.
भेटीगाठी, सत्कार समारंभांचा सपाटा
काही आमदारांनी कार्यकर्त्यांशी गोड बोलायला सुरुवात केल्याने निवडणुका आल्या असे म्हटले जाऊ लागले आहे. वर्तमानपत्रात प्रसिद्धीसाठी धडपड चालू झाली आहे. मतदारसंघातील संस्था, संघटना यांची आठवण आमदारांना अचानक झाली आहे. काहीतरी निमित्त साधून भेटीगाठी, सत्कार, मंत्र्यांचे कार्यक्रम असा सपाटा लावला आहे. आमदार निधी खर्च झाला का? याचा आढावा घेतला जात आहे. आमदारांकडून निधीसाठी मागण्या काय आल्या याचाही धांडोळा घेत आहेत. शिवाय राजकीय आढावाही मांडला जात आहे. पक्षात आमदारकीसाठी इच्छुक कोण आहेत? हासुद्धा कळीचा मुद्दा बनला आहे.