नंदुरबार। कॉग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपरिषद अंतर्गत शहरात विविध विकास कामे होत असले तरी या कामासाठी लागणारा निधी भाजप सरकार देत आहे, असे स्पष्ट मत भाजपा खासदार हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. नंदुरबार मतदार संघात मंजूर झालेल्या मोबाईल टॉवरची माहिती देण्यासाठी खासदार हिना गावित यांनी सोमवारी 7 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली.
खा.गावित यांचा सत्ताधार्यांना टोला
मतदारसंघात आपण 100 मोबाईल टॉवरची मागणी केली होती. केंद्रशासनाने त्यापैकी 69 टॉवर मंजूर केले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागात नेटवर्क राहून संपर्क साधण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या. नगरपालिका निवडणूकीविषयी बोलत असतांना त्यांनी सांगितले की, शहरात विकासकामे होत आहेत, परंतु त्यासाठी लागणारा निधी भाजप शासन देत आहे, हे कुणी विसरू नये, असा उपरोधिक टोला त्यांनी काँग्रेस सत्ताधार्यांना मारला. आगामी निवडणुकीसाठी भाजपा अंतर्गत बैठका होत असून स्वबळावर निवडणुका लढविण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. दरम्यान नंदुरबार पालिका कॉग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या ताब्यात आहे, त्यांच्या नियोजनानुसार शहरात विकास कामांचा धुमधडका सुरू आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही, पण या कामांना भाजप शासन निधी देत आहे, या खासदार हिना गावित यांच्या स्पष्टीकरनाने नवा वाद उभा राहण्याची शक्यता राजकिय गोटात वर्तविण्यात येत आहे. आता आमदार रघुवंशी यावर काय खुलासा करतात? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे.