भुसावळ। मुंबईतील आझाद मैदानावर विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकांनी अनुदान मिळण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे. संपाचा तिढा तातडीने सोडवून सर्व मागण्या मान्य करण्यासाठी उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी पायी मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर काढून प्रांत श्रीकुमार चिंचकर यांना साकडे घातले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी होणार्या शैक्षणिक नुकसानीची माहिती प्रांतांना देत तातडीने शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा, अशी विनंतीही केली.
दहा वर्षांपासून शिक्षक विनाअनुदान तत्वावर
शहरातील उसामा हायस्कूलमधील शिक्षक गेल्या पाच ते दहा वर्षांपासून विनाअनुदान तत्वावर अध्यापनाचे कार्य करीत आहे. ही समस्या सोडवण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळेपासून मोर्चा काढत विविध फलकांद्वारे शहरवासीयांचे लक्षही वेधले. प्रसंगी नरगीस शेख, तक्रार खान, अवेस शेख, तनवीर शाह, जांबाज शाह, आकीब पिंजारी, मोहम्मद साद, बिलाल शाह, मो.अदनानख, शेख उमेर, शेख कामील, नूर बेग, रेहान खान, नबील अहमद, मुख्तार शाह, सानिया बानो यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.