आकुर्डी : तावरणात सातत्याने होणार्या बदलांमुळे यंदा थंडीतील चढ-उतार सातत्याने कायम राहिला असून, जानेवारी महिन्यामध्ये पिंपरी-चिंचवडकरांना थंडीची नानारुपे अनुभवण्यास मिळाली असल्याचे दिसून येते. याच महिन्यामध्ये सलग तीन ते चार वेळा किमान तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार अनुभवण्यास मिळाला. जानेवारीच्या मध्यावर थेट 18 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले तापमान शेवटच्या आठवडयात 9 ते 10 अंशांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे दुपारी उकाडा आणि पहाटे थंडी अशी स्थितीही काही दिवस शहरात निर्माण झाली होती. उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांच्या तीव्रतेनुसार राज्याच्या विविध भागासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील किमान तापमानावर परिणाम होत असतो.
पुणे वेधशाळा आणि हवामान विभागाने नोंदविलेली आकडेवारी पाहता पुणे आणि परिसरातील थंडीच्या वातावरणामध्ये सातत्याने बदल झालेले दिसून येतात. थंडीला सुरुवात झाल्यानंतर काही कालावधीतच ओखी वादळाच्या परिणामाने शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी गायब झाली. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा थंडीने जोम धरला. याच कालावधीत शहरातील यंदाचे नीचांकी 8.4 तापमानाची नोंद झाली.