पुणे । शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इतर जिल्ह्यातील ई-रिक्षा (वीजेवर चालणारी) यंत्रणेच्या प्रणालीची अमंलबजावणी करण्यासाठी पुणे जिल्ह्यासह शहरातील विविध भागात ई- रिक्षा सुरू करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने (आरटीओ) हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. शहरातील 14 रस्त्यांवर वाहतूक विभाग आणि आरटीओच्यावतीने काही दिवसांत ई-रिक्षा रस्त्यावर सुसाटपणे धावणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे दिवसेंदिवस वाहन खरेदी करण्याचा आलेख वाढला आहे. सध्या शहरात जवळपास 48 ते 50 लाख वाहनांची संख्या आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्याच पार्श्वभुमीवर शासनाच्यावतीने ई-रिक्षांना परवानगी देण्यात आली आहे.
वेळेत मिळणार सेवा
वाहनांची संख्या वाढल्यामुळे मागील 10 वर्षांपासून शहरातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तसेच छोट्या अंतरासाठी अनेक रिक्षा चालकांकडून भाडे नाकारले जाते. तर काही वेळा नागरिकांकडून भाड्याची रक्कम मोठ्या प्रमाणावर आकारली जाते. त्यामुळे नागरिकांना वेळेत आणि कमी अंतरासाठी ई-रिक्षांद्वारे सेवा देण्यासाठी शहरातील मार्ग निश्चीत करण्यात आले आहेत.
परवान्याची गरज नाही
इतर राज्याप्रमाणे आणि जिल्ह्याप्रमाणे ई-रिक्षांची सेवा नागरिकांना मिळावी यासाठी प्रायोगिक तत्वावर शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ई-रिक्षा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात ई- रिक्षा चालविण्यासाठी आरटीओच्यावतीने ग्रामीण पोलीस कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना अल्पावधीतच ई-रिक्षांची सेवा मिळणार आहे. दरम्यान रिक्षा आणि ई-रिक्षांचे दरपत्रक तसेच मीटरचे अंतर यामधील तफावत कमी करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले जात आहे. त्यासाठी रिक्षा संघटना आणि आरटीओ यांच्यात विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजन केले जाणार आहे. दरम्यान ई-रिक्षा चालविण्यासाठी परवाना आवश्यक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना अतिशय कमी उत्पन्नात रोजगार उपलब्ध होणार आहे.
तीन आसनाची व्यवस्था
दरम्यान दिल्लीमध्ये प्रदूषण वाढीला आळा घालण्यासाठी सर्वप्रथम ई-रिक्षा चालविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्याच पाार्श्वभुमीवर राज्यातही ई-रिक्षांचा मार्ग मोकळा होण्यासाठी परिवहन विभागाने हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ई-रिक्षा सुरू करण्यात येणार आहे. ई-रिक्षामध्ये बसण्यासाठी तीन आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे.