शहरातील 15 मोबाईल टॉवरवर सीलची कारवाई

0

महसूल विभागाची धडक मोहीम

जळगाव: शहरातील विविध मोबाईल टॉवर कंपन्यांना जिल्हा प्रशासनाकडून नोटीस देवूनही त्यांनी 2020-2021 या वर्षाचे महसूल उद्दीष्ट न भरल्याने आज 5 फेब्रुवारी रोजी जळगाव शहरातील मोबाईल टॉवर सील करण्यात आले आहे. या कारवाईत सकाळी 9.30 पासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पांडे चौक, बी.जे मार्केट, आदर्शनगर, ओेंकारेश्वर मंदिर परिसर, शाहू नगरातील ट्रॉफिक गार्डन आणि भास्कर मार्केट परिसराह शहरात इतर ठिकाणी असे आठ टॉवर सील करण्यात आले आहेत. रात्री उशीरापर्यंत शहरातील एकूण 15 टॉवरवर कारवाई करणार असल्याची माहिती मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे यांनी दिली. यंदा जळगाव तालुक्यासाठी 2020-2021 या वर्षाकरीता 3635 लक्ष इतके महसूल उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण उद्दीष्टापैकी फक्त 46.57 टक्के इतकेच महसूल उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. उर्वरीत उद्दीष्ट पूर्ण करण्याबाबत 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सक्तीच्या सुचना दिल्या आहेत. तसेच थकबाकीदारांना नोटीस देण्यासह दंडात्मक कारवाईचे आदेश
दिले आहेत.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार महसूल उद्दीष्ट पूर्ण करण्यासह कार्यवाहीसाठी तहसीलदार नामदेव पाटील यांनी नियंत्रण अधिकारी पी.पी.राजपूत, मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, रामेश्वर जाधव, विरेंद्र पालवे, किरण सरोदे, आदिती जाधव, नितीन ब्याळे, रवींद्र घुले, राहूल अहिरे, प्रज्ञाराणी वंजारे या पथकाची नियुक्ती केली आहे. शहरातील मोबाईल कंपनीच्या टॉवरचे 2020-2021 या वर्षाचे प्रत्येकी 36 हजार 500 असे महसूल उद्दीष्ट आहे. याप्रमाणे जळगाव शहरातील 15 मोबाईल टॉवरचे एकूण 5 लाख 47 हजार 500 रुपये एवढी महसूली उद्दीष्ट वसूल करणे आहे. संबंधित मोबाईल टॉवरधारकांना नोटीस दिल्यानंतर पाच दिवसांच्या आत रक्कम भरणे अपेक्षित असते मात्र नोटीस दिल्यानंतरही उद्दीष्टानुसार वर्षासाठीची रक्कम न भरणारे मोबाईल टॉवर सील करण्याची कारवाई शुक्रवारी मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, मेहरुण तलाठी राजू बार्हे, तलाठी रमेश वंजारी यांच्यासह कर्मचार्यांच्या पथकाने केली. कारवाईत सकाळी 9.30 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पथकाकडून पांडे चौक, आदर्शनगर, ओंकारेश्वर मंदिर परिसर, भास्कर मार्केट व शाहू नगर असे आठ टॉवर सील करण्यात आले.