पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने रविवारी (दि.28) शहरातील 855 लसीकरण केंद्रांमार्फत पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. त्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे याचे चोख नियोजन करण्यात आले होते.
ठिकठिकाणी लसीकरण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पाच वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ लसिकरण करण्यासाठी शहरात 855 लसीकरण केंद्र स्थापन केली होती. महापालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी अशा 766 ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे स्थापन केली आहेत. फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी 58 फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली होती. या मोहिमेसाठी 53 वैद्यकीय अधिकारी, 193 पर्यवेक्षक व 2 हजार 734 लसीकरण कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी ठिकठिकाणी लसीकरण केले.
विद्यार्थी, स्वयंसेवकांचाही सहभाग
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, एमपीडब्ल्यु, एएनएम, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रीडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व इतर स्वयंसेवकांचा सहभाग होता. पाच वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओचा डोस देण्यासाठी नागरिकांनी मुलांना लसीकरण केंद्रावर घेऊन यावे, असे आवाहन पालिकेने केले होते.