जळगाव । शहरातील हेमंत ट्रान्सपोर्टसमोर उभा असलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने संशयिातांना पाळधी परिसरातील सावदे शिवारात ट्रक तोडत असतांना रंगेहात पकडले आहे. यात सात संशयितांना पोलिसांनी अटक केली असून मंगळवारी त्यांना न्यायाधीश बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या ताब्यातून ट्रक व ट्रक तोडण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
उडद घेऊन जळगावात आला ट्रक
फैजपुर येथील शेख इनूस शेख हसन यांच्या मालकीचा उडदने भरलेला एचआर.55.ई.6099 क्रमांकाचा ट्रक हा चालक चंद्रकुमार मेढे जळगाव येथे सुरेखा इंडस्ट्रीज येथे खाली करण्यासाठी घेवून आला होता. यावेळी किन्नर सतिश गाढे देखील सोबत होता. 12 नोव्हेंबर रोजी जळगावात आल्यानंतर ट्रकमधून माल खाली केल्यानंतर पुढील ट्रिप नसल्याने ट्रक हेमंत ट्रान्सपोर्ट समोरून उभा करून चालक मेढे हा फैजपुर येथे जाण्यासाठी निघून गेला. यानंतर काही तासानंतर किन्नर गाढे याने चालकास ट्रक चोरीची माहिती दिल्यानंतर मेढे यांनी ही माहिती लागलीच मालक शेख इनूस यांना दिली. त्यानंतर शेख इनूस यांच्या फिर्यादीवरून एमआडीसी पोलिस ठाण्यात साडेसात लाख रूपये किंमतीचा ट्रक चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.