नंदुरबार । जिल्ह्यातील कोणत्याही वाळू उत्खनन केंद्रांवर उपसा होत नसतांना नंदुरबार शहरातून दररोज मोठ्या प्रमाणावर वाळूने भरलेल्या ट्रका रवाना होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जवळच असलेल्या गुजरात राज्यातून वाळूची वाहतूक नंदुरबारमार्गे केली जात असल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विना रॉयल्टीची दररोज वाहने जात असल्याने शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. शासनाने वाळू उपशावर सध्या बंदी घातली आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीकाठीचे सर्वच झोन बंद आहेत. ही स्थिती असतांना नंदुरबार शहारातून वाळूने भरलेले डंपर जातात कसे आस प्रश्न निर्माण झाला आहे.जवळच असलेल्या गुजरात राज्यातून वाळू भरून ही डपर नंदुरबारमार्गे नाशिक, मुंबईकडे रवाना होतात. वास्तविक गुजरातच्या वाळू झोनमधून उपसा केलेली वाळू महाराष्ट्राच्या हद्दीतून नेता येत नाही. असे असतांना देखील तहसिल कार्यातयातील यंत्रणेच्या मुक संमतीने वाळू वाहतूक सुरू असल्याचे बोलले जात आहे.
अधिकार्यांच्या कार्यपध्दतींवर शंका
यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असल्याने अधिकार्यांच्या कार्यपद्धतींवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे. गुजरात राज्यातील झोनमधून वाळूची वाहने मोठ्या प्रमाणावर नंदुरबारमधून जात असतांना देखील महसूल यंत्रणेने कारवाई केल्याचे चित्र दिसत नाही. महाराष्ट्राच्या बनावट रॉयल्टी दाखवून वाळूची वाहतूक केली जात असल्याची चर्चा होत आहे. याची चौकशी झाल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. बनावट पावत्या दाखवून शासनाचा लाखो रूपयाचा गौण खनिजकर बुडविल्याचा प्रकार यापूर्वी नंदुरबार तालुक्यात घडला असून पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. आता ही तसाच प्रकार सुरू आहे की काय याची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी या वाळू वाहतूकीच्या तस्करीकडे लक्ष देवून शासनाची इभ्रत वाचवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.