शहरात आहेत 72 हजार मोकाट श्‍वान

0
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट श्‍वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या श्‍वानांच्या उपद्रवामुळे अनेक बालके, नागरिक जखमी झाल्याच्या वारंवार घटना घडत आहेत. शहरात तब्बल 72 हजार मोकाट श्‍वान आहेत. यावर्षी 14 हजार 907 श्‍वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी यांनी पशु वैद्यकीय विभागाला शहरातील मोकाट श्‍वानांची माहिती विचारली होती. त्यांना प्रशासनाने लेखी माहिती दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मोकाट श्‍वानांना पकडून त्यांच्यावर अशासकीय संस्थांमार्फत श्‍वान संतती नियमन शस्त्रक्रिया करण्यात येते. एका श्‍वानांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी महापालिका तब्बल 693 रूपये खर्च करते. सन 2015-16 मध्ये 15 हजार 808 श्‍वानांवर शस्त्रक्रियेसाठी 1 कोटी 9 लाख 55 हजार 523, सन 2016-17 मध्ये 12 हजार 581 श्‍वानांवर शस्त्रक्रियेसाठी 87 लाख 19 हजार 315 तर 2017-18 मध्ये 14 हजार 907 श्‍वानांवर शस्त्रक्रियेसाठी 1 कोटी 3 लाख 30 हजार 916 रूपये खर्च करण्यात आला आहे.
14 हजार 907 श्‍वानांवर शस्त्रक्रिया 
2018 मध्ये 15 हजार 160 मोकाट श्‍वान पकडले होते. यामध्ये 14 हजार 907 श्‍वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये 253 श्‍वान जखमी, आजारी, पूर्वी शस्त्रक्रिया झालेले होते. एकदा शस्त्रक्रिया झालेल्या श्‍वानांची ओळख व्हावी. यासाठी श्‍वानांच्या गळ्यात विविध रंगाचे बेल्ट बसविण्याचा विचार असल्याचे, स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले.