शहरात उन्हाचे चटके वाढल्याने नागरिक हैराण!

0

जळगाव। गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तापमानामध्ये वाढ झाल्याचे चित्र असून शहरात उन्हाचे चटके वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. एप्रिलमध्ये मे हिटचा तडाखा अनुभवयाला मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असून पाणी टंचाईच्या झळाही जिल्हाभरात अनेक ठिकाणी उग्र रूप घेत असून आगामी दोन महिन्यात परिस्थिती बिकट होऊ नये म्हणून पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. उन्हाळ्यात उष्माघताचा अधिक धोका असल्याने त्या पार्श्‍वभूमिवर नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

उकाड्यात भारनियमनाचा मार
दिवसेंदिवस तापमान उग्र रूप धारण करीत असून त्यात जळगाव तालुक्यात भारनियमाचा वेगळा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत असून युवा सेनेने या समस्येविरोधात आवाज उठविला असून महावितरणला हे भारनियमन बंद करावे यासाठी निवेदनही दिले आहे. महावितरणतर्फे अजून ठोस पावले उचलण्यात आलेली दिसत नाही. उकाळ्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे.

पाणीटंचाईचे संकट
जिल्हाभरातील जल पातळीत घट होत असल्याने आगामी काळात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे जागणार आहे. जिल्हाभरात पाणी टंचाई जाणवत असून कााही ठिकाणी टँकर सुरू करण्यात आली आहे. आगामी दोन महिन्यात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत पाणी अत्यंत काळजीने व गरजेपूरतेच वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही काळजी घ्या
गेल्या दोन दिवसांपासून तापमानाने पुन्हा उंची गाठण्याकडे वाटचाल केली आहे. अशा परिस्थितीत उष्माघाताचा मोठा धोका असतो. यात वेळेवर उपचार मिळाले नाही तर मृत्यूचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. तत्काळ थंड वातावरणातून अचानक तप्त उन्हात जाऊ नये किंवा तप्त उन्हातून थेट एसीत बसू नये यामुळे तामपानत होणारे मोठे बदल शरीर कधी कधी सहन करू शकत नाही. पाणी भरपूर प्यावे. शहरात पाण्याची कमतरता झाल्यास इतरही व्याधी जळतात. बाहेर पडताना शक्यतोवर पांढरे कपडे घालून व रूमाल बांधून बाहेर पडावे, अतिकष्टाची कामे उन्हात टाळावी.