शहरात गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ

0
मोहिमेत स्वेच्छेने लस घेणार्‍या विद्यार्थीनीचा महापौरांच्या हस्ते सत्कार
सर्व बालकांना एमआरची लस टोचणे शासनाचे उद्दीष्ट
पिंपरी चिंचवड : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासना मार्फ़त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात गोवर व रुबेला या धोकादायक रोगावरील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाला. 9 ते 15 वयोगटापर्यंतच्या बालकांसाठी गोवर – रुबेला लसीकरण राबविण्यात येत आहे. सर्वात प्रथम आणि स्वेच्छेने पुढे येवून लसीकरण केलेल्या जाधववाडी येथील साईजीवन प्राथमिक विद्यालयाच्या जयश्री देविदास मोरे या विद्यार्थीनीचा महापौरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, प्रशासन अधिकारी ज्योस्त्ना शिंदे, प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ. सुनिता साळवे, लायन्स क्लबचे डॉ. ललीत धोका, पंडित जाधव, गुलाब जाधव, मुख्याध्यापक शशीकांत गायकवाड उपस्थित होते.
बालकांना एमआर लस टोचणे महत्वाचे…
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारतर्फे गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम एका राष्ट्रव्यापी अभियान हाती घेण्यात आले आहे. शाळा आणि बाह्यसंपर्क सत्रांच्या माध्यमातून गोवर आणि रुबेलापासून बालकांचे रक्षण करणार्‍या गोरव – रुबेला (एमआर) लसीकरण मोहिमेचा प्रारंभ राज्यभरात झाला आहे. तसेच, नियमीत लसीकरणामध्ये एमआर लसीचा समावेश करण्यात येणार आहे. बालकांना एमआर एमएमआरची लस यापूर्वी टोचण्यात आली असली अथवा नसली तरी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांनी एमआरची लस टोचून घेणे महत्वाचे आहे. गोवरचे दुरीकरण आणि रुबेलाचे नियंत्रण करण्यासाठी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना एमआरची लस टोचणे अत्यावश्यक असल्याचे उद्दीष्ट्ये शासनाने ठेवले असल्याचे महापौर जाधव यांनी सांगितले. या अभियानात नागरिकांना सहभागी व्हावे, तसेच
अधिक माहितीसाठी आपल्या भागातील आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोवर – रुबेला हे जिवघेणे रोग..
गोवर हा प्राणघातक रोग आहे. ज्याचा प्रसार विषाणूद्वारे होतो. गोवरमुळे विविध प्रकारची गुंतागुंत होऊन बालकांचा अकाली मृत्यू होऊ शकतो. तसेच, रुबेला हा संसर्गजन्य रोग असून त्याचा प्रसार विषाणूमुळे होतो. त्याची लक्षणे गोवरसारखीच असतात. त्याचा संसर्ग मुले आणि मुली दोघांनाही होतो. तथापि, गर्भवती महिलेला गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात रुबेलाचा संसर्ग झाला तर त्याचा परिणाम सीआरएसमध्ये (जन्मजात रुबेला सिंड्रोम) होऊ शकतो. ज्याचे परिणाम गर्भासाठी आणि नवजात शिशुसाठी घातक ठरू शकतात, अशी माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.