जळगाव। शहरात डेग्यूंचे रूग्ण आढळत असून साथीच्या रोगांचा फैलाव होत असतांना प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केल्या जात नसल्यान स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक अनंत जोशी संतप्त झाले होते. ही सभा महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसर्या सभागृहात झाली. याप्रसंगी सभापती वर्षा खडके, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, उपायुक्त चंद्रकांत खोसे, सहाय्यक उपायुक्त लक्ष्मकांत कहार, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते. सदस्यांनी सभापती खडके व प्रभारी आयुक्तांसमोर समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाच्या तक्रारी केल्यात. यावेळी जिल्हाधिकारी यांचा तसेच वाढदिवसानिमित्त अनंत जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
धुरळणी, अबेटींग नसल्याची तक्रार
नगरसेवक अनंत जोशी यांनी जय नगर येथे डेंग्यूचे दोन रुग्णआढळल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यासह शहरात इतर ठिकाणीही साथीच्या रोगांचा फैलाव होत असल्याचे सांगीतले. मात्र, आरोग्य विभागाकडून डांस निर्मुलनासाठी धुरळणी व अबेटींग केले जात नसल्याची तक्रार केली. यावर आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी जेथे रुग्ण आढळतात तेथेच धुरळणी केली जात असल्याचे सांगीतल्याने जोशी व सभापती यांनी संताप व्यक्त केला. जोशी यांनी उपाययोजना व औषधीचा वापर योग्य पध्दतीने केल्या जात नसल्याचा आरोप केला.
आरोग्य अधिकार्यांची उडवा-उडवीची उत्तरे
पुथ्वीराज सोनवणे यांनी त्यांच्या वार्डातील कंटेनर उचलून नेलेल्या चालकावर अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आली नसल्याने संताप व्यक्त केला. तसेच सभापतींनी सूचना देवून दोन महिन्यानंतरही कॅरीबॅग बंदीची मोहीम राबविली नसल्याची तक्रार केली. ज्योती इंगळे यांनी कचरा वाहक गाडीतून कचरा नेतांना तो झाकला जात नसल्याची तक्रार पुन्हा केली. तर नवनाथ दारकुंडे यांनी त्यांच्या वार्डात अनेक स्वच्छता कर्मचारी रजेवर असल्याने काम होत नसून बंद पथदिव्यांबाबत तक्रार केली. यावर आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने सभापती खडके यांनी त्यांना खडसावले.
गटारींच्या निविदेबाबत प्रश्न
निविदेमध्ये गटारींच्या कामांचा समावेश असल्याने भाजपाचे पृथ्वीराज सोनवणे यांनी अमृत योजनेच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची व गटारींची कोणी कामे करता येतील याबाबत लेखी माहीती देण्याची मागणी शहर अभियंता सुनिल भोळे यांच्याकडे केली. भोळे यांनी स्वातंत्रचौक ते कालंकामाता मंदीर यादरम्यान पहिल्या टप्प्यात अमृत योजनेची कामे होणार असल्याचे सांगीतले. यावर सोनवणे यांनी 25 कोटींच्या निधीतून कोणती कामे करायची ? याबाबत माहीती मागितीली. अमृत योजनेतंर्गत शहरात पाणीपुरवठ्याची कामे करण्यात येणार आहे. यामुळे रस्त्यांची कामे घेऊ नये, असे सांगण्यात आले होते.
जीपीएस यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप
नगरसेविका गायत्री शिंदे यांनी त्यांच्या वार्डातील सार्वजनिक शौचालयाचे सेफ्टी टँक खाली करण्यासाठी अर्ज करुनही दखल घेतली नसल्याची व्यथा मांडली. ज्योती इंगळे यांनी खड्यांची दुरुस्ती होत नसल्याची तक्रार केली. तर सोनवणे यांनी रस्तेदुरुस्तीसाठी डांबर व खडीबाबत प्रश्न उपस्थित केला. चेतन शिरसाळे यांनी कचर्यांच्या वाहनांवरील जीपीएस यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप केला. टँक्टर मिळत नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्यात. पत्र देवून 20 दिवसानतंरही खड्डे न बुजविल्याने जोशी यांनी तक्रार केली.