अमळनेर- शहराततील फरशी रोड भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात दोन गटात रस्ता वापराच्या वादावरून दंगल झाल्याची घटना घडली आहे. यात एकावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटाच्या फिर्यादीनुसार एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावत विनयभंग केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत दोन्ही गटांकडून फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही गटांवर परस्परविरोधी दंगलीचा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल
रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी अफाक, नफीस अहमद वय २२ हा जिनगर गल्लीतून बोळीच्या मार्गाने येत असतांना हा वाद झाला. त्यात त्याच्यावर हाणामारीत तलवारीने हल्ला करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून राज रामराजे, आकाश संदानशिव, विशाल विजू सोनवणे, पप्पू बिऱ्हाडे, निखील संदानशिव, दिनेश संदानशिव, दादू पल्सरवाला, पप्प्या भरत, अजय बिऱ्हाडे डान्सर, समाधान बिऱ्हाडे, जितु डान्सर, राजू गढरी, बंटी, गढरी, दीपक गढरी, व इतर ५ ते ७ जणांविरुद्ध भादवी कलम ३०७, १४३, १४७, १४६, १४९, ३२३ सह शस्त्र कायदा ४/२५ व मुंबई पोलीसकायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परस्पर विरोधी गुन्हा दाखल
दुसऱ्या गटाकडून याच वादात फिर्यादी कल्पनाबाई अनिल रामराजे यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री ११ वाजता त्यांचा मुलगा राजरत्न व जाबिर कुरेशी याचा मुलाचे भांडण सुरू होते. त्यावेळी जाबिर कुरेशी हा देखील राजरत्नला मारत होता. गल्लीतील लोकांनी भांडण सोडवले आणि घरी पाठवले. मात्र काही वेळेनंतर जाबिर कुरेशी, मोहसीन कुरेशी मकबूल रेतीवाला, बाबा रेतीवाला, गण्या जागीर, सलमान कुरेशी, तोफिक कुरेशी सर्जीत खाटिक, जमील खाटिक, मुस्तफा कुरेशी, मकरार जावेद शेख, अफताब नफीस अहमद यांच्यासह जमावाने लाठ्या, काठ्या व मटण कापण्याचा सूरा घेऊन धावून आले आणि जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र काढून घेतले मारहाण केली. त्यामुळे भादवी कलम ३९५,१४३,१४७,१४९,३५४,३२३,५०४,५०६, शस्त्र कायदा ४/२५, अनुसुचीत जाती जमाती कायदा कलम ३,(१),(१०) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.