तळेगाव दाभाडे : शहरात सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाकडून देवी प्रतिष्ठापनेची आणि नवरात्र उत्सवाची तयारी वेगाने सुरु असून काही ठिकाणी गरबा, दांडियाचा सराव सध्या जोरात चालू आहे. येत्या बुधवारी नवरात्र उत्सवाची सुरुवात होत असून तळेगाव शहरातील श्री कालिका देवी मंदिर, शितळादेवी मंदिर, तुळजाभवानी मंदिर, मरिमाता देवी मंदिर, बोलाई देवी मंदिर, वरसुबाई देवी मंदिर, अंबिका देवी मंदिर आदी मंदिरामध्ये उत्सवासाठीची तयारी जोरात चालू असून काही मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. घरोघरी घटस्थापना आणि नवरात्र उत्सवासाठीची सर्व तयारी दिसून येत आहे. बाजार पेठांमध्ये देवीसाठी लागणार्या साहित्याची दुकाने सजली आहे, तर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. काही मंडळाकडून मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. भजन, प्रवचन तर काही ठिकाणी कीर्तनाचेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय शहरातील काही नवरात्र उत्सव मंडळांनी दररोज सकाळ संध्याकाळच्या महाआरतीची नियोजन केले आहे.