शहरात पुन्हा चर्चा मंत्रीपदाची

0
दिवाळीपूर्वी राज्य मंत्रीमंडळ विस्तारात मिळेल का स्थान
चिंचवडे लक्ष्मण जगताप की भोसरीचे महेश लांडगे?
पिंपरी-चिंचवड : आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या विस्तारात पिंपरी-चिंचवडमधून भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे या दोघांपैकी एकाची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याचे बोलते जात आहे. या दोन्ही आमदारांमध्ये मंत्रीपदावरुन जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. त्यामुळे मंत्रीपदाची माळ दोघांपैकी कोणाच्या गळ्यात पडणार? याची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, दोघांच्या वादात मावळचे आमदार बाळा भेगडे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार का? अशीही चर्चा सुरु झाली आहे.
महापालिकेत आणली सत्ता
भाजप-शिवसेना सरकारला चार वर्ष पूर्ण झाले. गेली अनेक महिन्यांपासून उत्सुकता असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या अखेरच्या विस्ताराला दस-यानंतर मुहूर्त मिळण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दिले. राष्ट्रवादीचा गड उद्धवस्त करत पिंपरी महापालिकेवर ’कमळ’ फुलविणारे जगताप आणि लांडगे या दोघांपैकी एकाची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. पालिकेत भाजपची सत्ता आल्यास शहराला ’लाल’ दिवा दिला जाईल, असे आश्‍वासन खुद्द फडणवीस यांनी दिले होते.
कॅबीनटे मंत्रीपदाची मागणी
त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारात शहरातील एका आमदाराचा समावेश करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाऊ, दादांपैकी नेमकी कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार याची चर्चा शहरात जोरदार सुरु आहे. तसेच कॅबिनेट मंत्रीपद मिळणार की राज्यमंत्री पद दिले जाणार अशीही चर्चा सुरु आहे. सरकारचे शेवटचे एक वर्ष राहिले आहे. त्यामुळे जेमतेम दहा महिन्याच्या कालावधी मिळणार आहे. राज्यमंत्र्याला जास्त अधिकार नसतात. मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी केल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्टी देखील या आमदारांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करत आहेत.
मतभेद झाले, तर भेगडे?
फडणवीस दोन्ही आमदार जगताप आणि लांडगे यांच्यापैकी नेमकी कोणाला संधी देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकाला मंत्रीपद दिले तर दुसरा नाराज होणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे पक्षश्रेष्टी विचार करुन निर्णय घेणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले तर मावळचे भाजप आमदार बाळा भेगडे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रा. मोरेंनंतर मंत्रीपदच नाही
दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप किंवा महेश लांडगे या दोघांपैकी एकजण मंत्री झाल्यास पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले मंत्री होण्याचा मान त्यांना मिळणार आहे. दिवंगत शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे हे देहूचे होते. त्यांनी शहराचा कारभार हाकला. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्बल 15 ते 20 वर्ष शहरावर हुकुमत गाजविली. ते बारामतीचे आहेत. फेब्रुवारी 2017 पासून जगताप आणि लांडगे पालिकेवर हुकुमत गाजवित आहेत. आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहराला एकदाही मंत्रीपदाचा मान मिळाला नाही. आता आमदार जगताप व लांडगे यांच्या रुपाने तो मान मिळण्याची दाट शक्यता आहे.