पुणे । गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली. भाजपच्या या विजयाचा शहर कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. शहर कार्यालय फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. समर्थ नेतृत्व, सार्थ विश्वास या आशयाचे मोदी व शाह यांच्या छबी असणारे फलक लावण्यात आले होते. येणार्या प्रत्येकाला चंद्रकला, बालुशाही अशी अस्सल गुजराती मिठाई देऊन अभिनंदन करण्यात येत होते.
चंचला कोद्रे यांना श्रध्दांजली
शहर भाजपचा विजयोत्सव सुरू असतानाच माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनाची बातमी आली. त्यामुळे विजयोत्सवाचे सर्व कार्यक्रम बंद करून कोद्रे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
‘भाजपच्या नेत्यांनी हवेत राहू नये’
भाजपच्या नेत्यांनी यापुढे हवेत राहू नये. गुजरातचा निकाल धक्कादायक आहे, अशा प्रतिक्रिया भाजपच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी गुजरात विधानसभा निवडणूक निकालानंतर व्यक्त केल्या.गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळाले. पण, त्याचा जल्लोष साजरा करताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अजिबात नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरात म्हणजे होम पीच. तिथे पक्षाच्या जागा घेतल्या, काँग्रेसची मते वाढली याचा धसका पक्षातील जाणकारांनी घेतल्याचे अनौपचारिक चर्चेत आढळून आले. 2014 पासून आमचे नेते हवेत वावरत आहेत. पुण्यात लोकसभा, विधानसभा आणि महापालिका भाजपला 100 टक्के यश मिळाले. परंतु पुणेकरांना पक्ष रिझल्ट देऊ शकलेला नाही. मध्यंतरी पक्षाने आयाराम, गयाराम यांचे स्वागत करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे निष्ठावंत दुरावलेले आहेत. शिवाय पक्षात गटबाजी बोकाळली आहे. मेट्रो, नदी सुधार, पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटी अशा घोषणांचा धडाका आहे. प्रत्यक्षात यातील काहीच उतरलेले नाही.
भाजपला धोका
गुजरातमध्ये प्रचाराचा झंझावात होता. नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, हार्दिक पटेल यांनी सारा गुजरात प्रचाराने ढवळून काढला होता. तरीही मतदान तीन टक्के कमी झाले. त्याचा फटका भाजपला बसला आहे. पुण्यात मतदान कमी झाले तर ते भाजपला घातक ठरणार आहे. नोटाचा वापर करण्याचे प्रमाण पुण्यात जास्त राहील, त्यातूनही भाजपला चकवा दिला जाईल.
मागासवर्गीय, अल्पसंख्य समाज पुन्हा काँग्रेसकडे
गेल्या लोकसभेला राहुल गांधी यांनी युवकाला स्थान देण्याच्या प्रयत्नात पुण्यात बाहेरचा उमेदवार लादला. त्याची जबर किंमत भोगावी लागली. ही चूक 2019 मध्ये काँग्रेस पक्ष करणार नाही. गुजरात निकालाने उत्साहीत झालेला काँग्रेस कार्यकर्ता राहुलजींसाठी एकजुटीने काम करेल, याची नोंद भाजपला घ्यावी लागेल. मागासवर्गीय, अल्पसंख्य समाज काँग्रेसपासून दुरावला होता. हा वर्ग पुन्हा काँग्रेसकडे झुकू लागला आहे. शहरी भागात हा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पुणे, मुंबईत काँग्रेस चुरशीची लढत देईल.
कार्यकर्त्यांनी धरला ताल!
ध्वनिवर्धकावर राष्ट्रभक्तीपर गाणी लावण्यात आली होती. बँड आणि ढोल पथकाच्या तालावर कार्यकर्ते आनंदाने नाचत होते. शहराच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शहर कार्यालयात येत होते. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत, महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी भोसले, विधी समितीच्या अध्यक्षा गायत्री खडके यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक याप्रसंगी उपस्थित होते. युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पोटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला मेंगडे, पक्षाचे सरचिटणीस दीपक मिसाळ, गणेश घोष, उपाध्यक्ष शाम सातपुते, दत्ता खाडे, सुनील कांबळे, डॉ. संदीप बुटाला, कार्यालय मंत्री उदय जोशी, कोषाध्यक्ष प्रा. विनायक आंबेकर, गिरीश खत्री, रफीक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
विकासाला वेडपट म्हणणार्यांना चपराक
भारतीय जनता पार्टीने गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विजय मिळवला आहे. याबद्दल त्या ठिकाणच्या मतदारांना धन्यवाद दिले पाहिजेत. हा विजय भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी, अमितभाई शहा आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून मिळालेला आहे. विरोधकांनी, विशेष करून काँग्रेसने जातीयवादी आणि धार्मिक भावनांना नेहमीच खतपाणी घालणार्या नेत्यांच्या सहकार्याने प्रचाराची आघाडी उघडली होती. त्यामुळेच विकास रथाला, विकासाच्या कल्पनांना वेडपट म्हणण्याइतकी त्यांची मजल होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील जनतेने दिलेली चपराक पुरेशी बोलकी आहे. स्थानिक आणि केंद्रीय पातळीवर जातीय विषयांना खतपाणी घालणार्या प्रयत्नांना भविष्यकाळामध्ये देशाच्या विकासाचा अडथळा म्हणूनच आपल्याला पाहावे लागेल. हा या निवडणुकीचा बोध आहे, असे आम्ही मानतो. ‘सब का साथ सब का विकास’ यातील एकात्मतेची भावना आपल्याला भविष्यामध्ये अधिक वेगाने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवली पाहिजे.
– योगेश गोगावले, शहराध्यक्ष