जळगाव। महिनाभरापासून सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांच्या रोजाची सांगता सोमवारी 26 जून सोमवार रोजी हजारो बांधवांच्या सामूहिक नमाजपठण जळगाव शहरातील ईदगाह मैदानावर करण्यात आले. रमजान ईदनिमित्त शहरातील मशिदींमध्ये आकर्षक सजावट करून रोषणाई करण्यात आली होती. मशिदींच्या बाहेर गुलाबांसह अन्य फुले विक्री करणार्या गाड्यांची गर्दी होती. जळगावातील इदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांची शहरातील अजिंठा चौफुलीपासून, टॉवर चौक, शनिपेठ, भिलपुरा, काटाफाईल, तांबापुरा यांच्यासह परिसरातून मोठ्या संख्येत मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.
देशाला महासत्ता बनविण्यासाठी अल्लाहला साकडे
अजिंठा चौफुली जवळील इदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता मुस्लिम बांधवांनी नमाज पठणास सुरुवात केली. देशात चांगला पाऊस होवून दे, विश्व शांतीच्या नांदू दे , देशातील सर्व समाजाच्या बांधवांना एकत्र ठेव, प्रामाणिक बनव, दुश्मनापासून देशाचे संरक्षण कर आणि या देशाला महासत्ता बनव, अशी दुआ अल्लाहकडे मुस्लिम बांधवाने यावेळी केली. यावेळी हिलाल कमेटीचे अध्यक्ष करीम सालार उपस्थित होते. मौलाना उस्मानी यांनी नमाज पठण करुन दुवॉ मागीतली. ईद निमित्त सकाळपासून उत्साह व चैतन्याचे वातावरण होते. इदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधव उपस्थित होते. इदगाह मैदानावर आ. सुरेश भोळे यांनी मुस्लीम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्यात.
शीरखुर्म्यासह शुभेच्छा!
शहरातील तांबापूरा, शनिपेठ, शाहूनगर या ठिकाणच्या मशिदीमध्येही मुस्लिम भाविकांची मोठी गर्दी झाली होती. याप्रसंगी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्यात तर सायंकाळी सुकामेवा, शेवयांचे दूधात एकत्रीकरण करून शिरखुर्म्यासाठी आप्तेष्टांना घरी बोलाविण्यात आले. रात्री उशीरार्यंत शुभेच्छा देण्यासाठी ऐकमेकांच्या घरी जाण्यासाठी नागरिकांची घाईगर्दी
सुरु होती.
ईदगाहवर नमाज
जळगावातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी सुप्रिम कॉलीनीतील सुन्नी ईदगाह मैदानवार सुन्नी जामा मस्जिद भिलपुराचे पेश इमाम मौलाना जाबीर रजा रजवी यांच्या नेतृत्वात नमाज ऐ ईद-उल-फित्र ईदची नमाज पठण केली. याप्रसंगी सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सैय्यद अयाज अली नियाज अली यांनी प्रास्ताविकात जैन समुहाने इदगाह मैदानाला संरक्षक भिंत करुन दिल्याबद्दल आभार मानले. राष्ट्रीय एकत्मका जपण्याचे आवाहन अयाज अली यांनी केले.
नमाज पठनाचे सांगितले महत्व
मौलाना नजमुल हक यांनी तरीका-ए-नमाज अर्थातच नमाज पठणाचे महत्व सांगीतले. मौलाना नजमुल हक व मौलानामुफ्ती रेहान रजा यांनीही मार्गदर्शन केले. मौलान जुबेर आलम यांनी सलाती सलाम म्हटले. यावेळी देशात चांगला पाऊस व्हावा, शांतता नांदावी, भारत महासत्ता व्हावा, शत्रुंपासून देशाचे रक्षण कर, चांगले आरोग्यं दे, दहशतवाद व भ्रष्टाचार नाहीसा होवू दे. व आपसात प्रेमभावना वाढीस लागू दे अशी दुआँ करण्यात आली. यावेळी सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सैय्यद अयाज अली नियाज अली, मौलाना जाकीर रजा रजवी, मौलाना मुफ्ती रेहान रजा, मौलाना नजमुल हक, मौलाना मुफ्ती इन्तेखाब अशरफ यांच्यासह हजारो मुस्लीम बांधव उपस्थित होते.