भुसावळ । शहरातील मुक्ताई कॉलनी मधील रहिवासी रेल्वे लाईनकडून आपल्या दुचाकीने घराकडे जात असताना अचानकपणे एका अज्ञात भामट्याने त्यांना रस्त्यात अडवून धक्काबुक्की करुन त्यांच्याकडील रोकड व ऐवज लुटून पसार झाल्याची सोमवार 17 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकात आज अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटील यांचा हात फ्रॅक्चर
मुक्ताई कॉलनी मधील भास्कर रघुनाथ पाटील (वय 49) हे सोमवार 17 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास रेल्वे लाईन खांब क्रमांक 441/36 जवळून जात असतांना एका अज्ञात भामट्याने त्यांना रस्त्यात अडवून बळजबरीने धक्काबुक्की व हात पिरगळून फ्रॅक्चर करुन त्यांच्याकडील दूचाकी, 18 हजार रुपये रोख व एटीएम कार्ड असा ऐवज घेऊन पसार झाला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील व पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे. दरम्यान शहरात दिवसाढवळ्या नागरिकांची लुटमार केली जात असून पोलीसांचा धाक संपला असल्याचे दिसून येते. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर टवाळखोर उभे राहून महिला व तरुणींची छेडखानी केली जाते. अशा टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.